दौंड तालुक्यातील जलजीवन योजनांचा खुलासा ‘बीडीओं’नी मागविला | पुढारी

दौंड तालुक्यातील जलजीवन योजनांचा खुलासा ‘बीडीओं’नी मागविला

केडगाव : पुढारी वृत्तसेवा :  दौंड तालुक्यातील जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामातील अनागोंदी दै. ’पुढारी’ने उघड केल्यानंतर पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांनी (बीडीओ) पाणीपुरवठा विभागाकडून लेखी खुलासा मागितला आहे. दौंड तालुक्यात या योजनेत मोठा गोंधळ करण्यात आला आहे. योजनेसाठी जिल्हा परिषदेने खासगी संस्थेकडून सर्व्हे केला आहे. सर्व्हे करताना सरपंच, सदस्यांना कोणतीच माहिती दिली नाही. अनेक ठिकाणी पाण्याच्या टाकीची आणि शुद्धीकरणाच्या प्रकल्पाच्या जागेच्या निश्चितीबाबत कुठल्याही स्वरूपाचे दस्तावेज करण्यात आलेले नाहीत. जागा निश्चित न केल्याने या योजनेचा सध्या बट्ट्याबोळ सुरू असून, यापैकी कडेठाण गावात आजही जागेबाबतचा मोठा वाद सुरू आहे. कानगाव येथे वाद झाला आहे. खासगी संस्थेने केलेल्या सर्व्हेवर जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांनी तांत्रिक मान्यता देऊन योजना अधिकृत केल्या आहेत. आजही ग्रामपंचायत आणि गावकर्‍यांना काही ठिकाणी योजनेबद्दल काहीच माहिती नाही.

या योजनेच्या अगोदरच्या योजना काही गावांत फक्त वीजबिले न भरल्याने बंद झाल्या आहेत. अशा काही गावांमध्ये आधीची योजना कशामुळे बंद आहे, हे न पाहता साधारण कमीत कमी दोन कोटी आणि जास्तीत जास्त वीस कोटी रुपयांपर्यंत निधी, अशा गावांवर टाकण्यात आलेला आहे. दौंड शहराजवळील गोपाळवाडी गावामध्ये 40 लाख रुपयांची योजना आज सुव्यवस्थेत कार्यरत असून, या ठिकाणीसुद्धा जवळपास 4 कोटी रुपयांचा निधी टाकून नवीन योजनेचा घाट घालण्यात आलेला आहे.

पहिलीच योजना तंदुरुस्त असताना दुसर्‍या योजनेसाठी एवढी मोठी रक्कम टाकण्याचे नक्की प्रयोजन काय? याबद्दल काहीच माहिती विभाग देत नाही. लिंगाळी गावामध्येही यापूर्वीची पाणी योजना सुरू आहे. अनेक नळ पाणीपुरवठ्याच्या योजना झाल्याने नक्की कोणत्या पाइपमधून कोणत्या योजनेचे पाणी येणार आहे, हे गावकर्‍यांसह पाणी विभागाच्या अधिकार्‍यांना विचारल्यास सांगता येणे अवघड आहे, अशी माहिती या ठिकाणच्या काही ग्रामस्थांनी दिली आहे.

पिंपळगाव येथेसुद्धा यापूर्वीची योजना माटोबा तलावातून पिंपळगावपर्यंत आणण्यात आलेली आहे, नव्यानेसुद्धा याच ठिकाणी परत एक जलवाहिनी होत असून, पहिल्या जलवाहिनीसाठी केलेला खर्च आणि नव्याने होत असलेल्या खर्चाची एकाच गावात दोनवेळा होणारी ही प्रक्रिया नक्की कशासाठी आहे? यातून काय साध्य करायचे? हा प्रश्न ऐरणीवर येतो. अशा स्वरूपाच्या तालुक्यातील अनेक गावांतील पाणी योजना दोन-तीनवेळा करण्याचा घाट घालण्यात आल्यामुळे याची प्रामाणिकपणाने चौकशी केल्यास दौंड तालुक्यात नळ पाणीपुरवठ्याचे पाणीच पेटल्याशिवाय राहणार नाही, अशी खात्रीलायक माहिती या योजनेला वैतागलेले गावकरी राजरोसपणे देऊ लागले.
रिपब्लिकन सेनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल साळवे आणि सेना सदस्य आनंद बगाडे यांनी गटविकास अधिकारी दौंड यांच्याकडे या योजनांची माहिती लेखी स्वरूपाने मागणी केली आहे. ठेकेदारांना आत्तापर्यंत किती रकमा दिल्या गेल्या आहेत आणि कामे कोणती किती टक्के अपूर्ण आहेत, याची तत्काळ माहिती मागवलेली आहे.

 

Back to top button