Ashok Chavan Resign : हिंगोलीत काँग्रेसला पडणार खिंडार?; अशोक चव्हाण समर्थकांच्या भूमिकेकडे नजरा

Ashok Shankarrao Chavan
Ashok Shankarrao Chavan
Published on
Updated on


हिंगोली: राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे. तर हिंगोली काँग्रेसलाही भगदाड पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील वर्षभरापासून हिंगोली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणुकीची तयारी करणार्‍या डॉ. अंकुश देवसरकर यांची मात्र चव्हाण यांच्या भुमिकेमुळे कोंडी झाली आहे. ते आता नेमकी कोणती भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Ashok Chavan Resign

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यात अगोदरच मरगळ आलेल्या काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. चव्हाण यांचे हिंगोली जिल्हयात अनेक समर्थक आहेत. विशेष म्हणजे त्यांचे आजोळ हे आखाडा बाळापूर असल्याने त्यांचे हिंगोलीशी कायम जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. त्यांनी आता दोन दिवसांत आपला राजकीय निर्णय जाहीर करू असे स्पष्ट केल्याने हिंगोली काँग्रेस पदाधिकार्‍यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांना अशोक चव्हाणांचा आधार होता. परंतु आता अशोक चव्हाणच भाजपच्या वाटेवर असल्याने त्यांचे कट्टर समर्थक त्यांच्या समवेत भाजपमध्ये जातील अशा अटकळी बांधल्या जात आहेत. Ashok Chavan Resign

वसमत, आखाडा बाळापूर, कळमनुरी, औंढा नागनाथ व हिंगोली शहरात अशोक चव्हाणांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मोठ्या घडामोडी घडून अनेक दिग्गज नेते अशोक चव्हाणांच्या मागे जातील, अशी चर्चाही जोरात सुरू झाली आहे. विशेष करून माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असताना त्यांनी मात्र वेट अ‍ॅन्ड वॉच ची भूमिका घेतली आहे. चव्हाण यांनी फक्‍त राजीनामा दिला आहे. ते नेमके कोणत्या पक्षात जाणार आहेत, याबाबत स्पष्ट झाले नसल्याने आताच प्रतिक्रिया देणे योग्य नसल्याचे माजी आमदार भाऊराव पाटील यांनी सांगितले.

तर त्यांच्या विरोधातील काँग्रेसचा एक गट मात्र, अशोक चव्हाणांसोबत जाईल, असा अंदाज व्यक्‍त केला जात आहे. अशोक चव्हाणांच्या काँग्रेसच्या राजीनाम्यामुळे हिंगोली काँग्रेसला मोठा धक्‍का मानला जात आहे. येत्या दोन दिवसात त्यांची पुढील दिशा स्पष्ट होणार असल्याने गुरूवारनंतर हिंगोलीतही राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Ashok Chavan Resign : डॉ. देवसरकरांच्या भूमिकेकडे लक्ष

मागील वर्षभरापासून हिंगोली लोकसभा मतदार संघातून काँग्रेसकडून तयारी करणार्‍या डॉ. अंकुश देवसरकर यांना चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे मोठी अडचण झाली आहे. चव्हाणांना नेता मानणार्‍या डॉ. देवसरकर हे आता चव्हाणांसोबत जातात की काँग्रेसमध्ये थांबून लोकसभेची खिंड लढतात, याबाबत उत्सुकता लागली आहे. तर दुसरीकडे चव्हाण हे डॉ. देवसरकर यांच्यासाठी हिंगोली लोकसभा मतदार संघ भाजपकडे सोडवून त्यांना मैदानात उतरवितात, ही एक शक्यताही वर्तविण्यात येत आहे. परंतु सध्यातरी डॉ. देवसरकर यांची कोंडी झाल्याचे चित्र आहे.

भाजपतील इच्छुकांमध्ये घालमेल

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला राम राम ठोकल्याने काँग्रेसला हादरा बसला असताना दुसरीकडे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांची घालमेल सुरू झाल्याचे बोलले जात आहे. राजकारणात काहीही घडू शकते, या उक्‍तीनुसार ऐनवेळी चव्हाण यांच्या मर्जीतील उमेदवार हिंगोली लोकसभा मतदार संघातून दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने भाजपतील इच्छुकांचीही घालमेल सुरू असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना डॉ. अंकुश देवसरकर यांच्या कोंडीमुळे आपला स्पर्धक बाद झाल्याचा आनंद झाल्याचेही बोलले जात आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news