

छत्रपती संभाजीनगर: पुढारी वृत्तसेवा : पतसंस्थेतील ठेवीदारांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज (दि.३०) दुपारी आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि ठेवीदारांच्या धक्काबुक्कीमध्ये महिला पोलीस जखमी झाल्या. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तीन ते चार जण बेशुद्ध पडल्याची माहिती मिळत आहे.
आदर्श नागरी पतसंस्था, आदर्श नागरी महिला बँक, अजिंठा अर्बन को. आप. बँक, ज्ञानोबा अर्बन को आप. क्रेडिट सोसायटी लि, आशा इन्व्हेस्टमेंट एंड डेव्हलपर्स, यशस्विनी, कृष्णाई, नवरंग, आधार, राधाई पतसंस्था, मलकापूर अर्बन को. ऑप. बँक. लि. या पतसंस्थांमध्ये हजारो नागरिकांनी गुंतवणूक केली आहे. परंतु, या सर्व पतसंस्थांनी आता गाशा गुंडाळून पळ काढला. अनेक ठेवीदारांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दुपारपासून ठेवीदारांचे आंदोलन सुरू होते.
मात्र, निवेदन देण्यासाठी पोलिसांनी महिलांना विभागीय आयुक्त कार्यालयात जाण्याची परवानगी दिली. पण त्यांच्या पाठोपाठ पुरुष देखील मोठ्या संख्येने आत शिरले. यावेळी पोलीस आणि ठेवीदारांच्या धक्काबुक्कीमध्ये पोलीस महिला जखमी झाल्या. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.
या घटनेत तीन ते चार जण बेशुद्ध पडल्याची माहिती मिळत आहे. या गोंधळानंतर खासदार जलील यांच्यासह ठेवीदारांचा मोठा जमाव विभागीय आयुक्तांच्या दालनासमोरील पायऱ्यांवर जमला. विभागीय आयुक्त यांनी ठेवीदारांना पैसे मिळवून देण्याचे लेखी पत्र द्यावे, याशिवाय येथून हलणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला. संध्याकाळपर्यंत गोंधळ सुरू होता.
हेही वाचा