छ. संभाजीनगर : पैठण येथे जि.प. सदस्याच्या पतीकडून पोलिसाला मारहाण | पुढारी

छ. संभाजीनगर : पैठण येथे जि.प. सदस्याच्या पतीकडून पोलिसाला मारहाण

पैठण, पुढारी वृत्तसेवा: एकादशीच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला आपेगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य यांच्या पतीकडून मारहाण झाल्याची घटना आज (दि.२१) घडली. याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्या शिल्पा कापसे यांचे पती ज्ञानेश्वर कापसे यांच्याविरुद्ध पैठण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पैठण येथे पुत्रदा एकादशी निमित्त श्रीसंत एकनाथ महाराज मंदिर परिसरात वाहनाची गर्दी होऊ नये, यासाठी मंदिराच्या मार्गावर खंडोबा मंदिर चौकात वाहन नेण्यास प्रतिबंधक करण्यासाठी बॅरिकेट्स लावल्या आहेत. तसेच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आज सकाळी साडेनऊ वाजता ज्ञानेश्वर कापसे यांना बंदोबस्तावर असलेले पोलीस कर्मचारी देवीचंद भाऊलाल घुनावत यांनी जाण्यास विरोध केला. त्यामुळे कापसे यांनी तू मला ओळखत नाहीस का? मी कोण आहे माहीत आहेत का? असे म्हणून पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून शिवीगाळ केली. तसेच धक्काबुक्की करून मारहाण केली.

याप्रकरणी पोलीस कर्मचारी घुनावत यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी ज्ञानेश्वर कापसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार एस. आर. चेडे करीत आहे.

हेही वाचा 

Back to top button