नांदेड : मॉनिंग वॉकला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांना अज्ञात वाहनाने चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू | पुढारी

नांदेड : मॉनिंग वॉकला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांना अज्ञात वाहनाने चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू

भोकर; पुढारी वृत्तसेवा : मुंबई – निर्मल राष्ट्रीय महामार्गावर माॅर्निंग वाॅक करणाऱ्या दोन शालेय विद्यार्थ्यांना चिरडल्याची घटना आज (दि.12) घडली. ही घटना भोकर-नांदेड रस्त्यावर सकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

या अपघातात संकेत दत्ता पाशेमवाड (वय १७, इयत्ता १० वी. कै. मोहनराव देशमुख विद्यालय भोसी) व वैभव दत्ता येळणे (१८, इयत्ता ११ वी, कै. लक्ष्मणराव घिसेवाड कनिष्ठ महाविद्यालय भोकर) दोघे रा. खरबी ता. भोकर यांचा मृत्यू झाला.

हे दोघे नेहमीप्रमाणे गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर माॅर्निंगवाॅक, रनिंग करीत होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाचा ताबा सुटल्याने दोन्ही विद्यार्थ्यांना धडक दिली. यामध्ये दोन्ही शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

मयत संकेतच्या पश्चात आई, वडील लहान बहीण असा परिवार आहे. कुटुंबातील एकुलता मुलगा गेल्याने, परिवारावर दुःखाचे संकट कोसळले आहे. तर मयत वैभवच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. एकाच घटनेत खरबी गावातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच भोकर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

हेही वाचा :

Back to top button