ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेन याने ॲशेस मालिकेच्या तोंडावरच संघाचे कर्णधारपद सोडले. राजीनाम्याचा हा धक्कादायक निर्णय त्याने आज होबर्ट येथे पत्रकार परिषद घेत घोषित केला. त्याने आपला राजीनामा हा जुन्या सेक्सटिंग चॅट प्रकरणामुळे दिला आहे. ३६वर्षाच्या टीम पेन याला बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार करण्यात आले होते.
टीम पेन याने दिलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, 'आज मी घोषणा करत आहे की मी ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचे कर्णधारपद सोडत आहे. हा खूप कठिण निर्णय होता. पण, हा माझ्यासाठी, माझ्या कुटुंबीयांसाठी आणि क्रिकेटसाठी योग्य निर्णय होता.'
मी चार वर्षापूर्वी एका सहकाऱ्याबरोबर एका वादग्रस्त चॅटमध्ये गुंतलो होतो. त्यावेळी हे प्रकरण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या इंटिग्रिटी युनिटकडे तपासासाठी होते. या तपासात मी खुल्यापणाने सहभाग नोंदवला होता. हा तपास आणि क्रिकेट टास्मानिया एचआर तपासात या प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही आचारसंहितेचे उल्लंघन झालेले नाही असा निष्कर्ष निघाला होता.'
टीम पेन पुढे म्हणाला की, 'जरी आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन झाले नसले तरी मला या घटनेबद्दल खूप पश्चाताप झाला होता आणि आजही होत आहे. त्यावेळी मी माझ्या बायको आणि कुटुंबाशी बोललो होतो. त्यावेळी त्यांनी मला माफ करुन दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आम्हाला वाटले होते की हे प्रकरण आता मागे पडले आहे. त्यामुळे मी आता माझ्या संघावर लक्ष केंद्रीत करु शकतो आणि मी गेल्या तीन ते चार वर्षापासून ते करतही आहे.'
'मात्र आता मला कळाले आहे की हे प्रायव्हेट चॅट सार्वजनिक होणार आहे. मी २०१७ मध्ये केलेली कृती ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला शोभणारी नाही. मी माझ्या पत्नीला, कुटुंबाला आणि इतरांना दिलेल्या वेदनांबद्दल माफी मागतो. या प्रकरणामुळे आपल्या खेळाच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्यामुळे मी माफी मागतो. मला वाटते की मी तत्काळ कर्णधारपद सोडणेच योग्य आहे. माझ्या या प्रकरणामुळे अॅशेस मालिकेच्या तोंडावर संघाला कोणत्याही बाधा पोहचू नये असे मला वाटते.'
हेही वाचा :
आपले कर्णधारपद सोडल्यानंतर टीम पेनने सांगितले की, 'ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून मला माझा भुमिका आवडत होती. हा माझ्या खेळाडू म्हणून असलेल्या आयुष्यातील मोठा सन्मान होता. संघ सहकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. आम्ही सर्वांनी मिळून जे काही कमावले आहे त्यावर मला अभिमान आहे. मी त्यांच्याकडून मला त्यांनी समजून घ्यावे आणि माफ करावे अशी विनंती करतो. मी चाहत्यांचही माफी मागतो.'
दरम्यान, पेनने तो ऑस्ट्रेलिया संघातील एक खेळाडू म्हणून अॅशेस मालिकेत खेळणार असल्याचे सांगितले. ऑस्ट्रेलियन माध्यमांमधून मिळालेल्या वृत्तांनुसार टीम पेनने २०१७ ला आपल्या महिला सहकाऱ्याला आक्षेपार्ह मेसेज केले होते.