Manoj Jarange-Patil : बाळासाहेब ठाकरेंनंतर जरांगे- पाटील ठरणार पहिले नेते; सेलूत धडाडणार तोफ | पुढारी

Manoj Jarange-Patil : बाळासाहेब ठाकरेंनंतर जरांगे- पाटील ठरणार पहिले नेते; सेलूत धडाडणार तोफ

सेलू , पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांची जाहीर सभा सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर शुक्रवारी (दि. २२) होणार आहे. या सभेची पूर्व तयारी झाली आहे. या मैदानावर याआधी १९९० व १९९५ मध्ये दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दोन वेळा जाहीर सभा झाल्या आहेत. त्यानंतर आता या मैदानावर जरांगे- पाटील यांची तोफ धडाडणार आहे.  Manoj Jarange-Patil

मैदानावर साफसफाई पूर्ण होत आली आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर आजुबाजुच्या मोकळ्या जागा, रस्ते व मैदाने देखील स्वच्छ केली जात आहेत. सभेच्या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी पदयात्रेद्वारे मराठा आरक्षणाचा जागर घालून वातावरण निर्मिती केली जात आहे. ग्रामीण भागातील सकल मराठा समाज बांधवांचा यामध्ये मोठा सहभाग आहे. दररोज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून शहरात पदयात्रा काढली जात आहे. महिला, शाळकरी विद्यार्थी यांचाही यामध्ये सहभाग आहे. Manoj Jarange-Patil

एक डिसेंबरपासून सुरू झालेल्या साखळी उपोषणात गुगळी धामणगाव, हिस्सी, तिडी पिंपळगाव, झोडगाव आदींसह ४० गावातील मराठा बांधव सहभागी झाले होते. पदयात्रेत भगवे झेंडे हाती घेऊन तसेच “मराठा एकजुटीचा विजय असो, लढेंगे जितेंगे हम सब जरांगे, एक मराठा लाख मराठा” अशा आशयाचे फलक घेऊन घोषणा करीत आरक्षणाचा जागर घातला जात आहे.

Manoj Jarange-Patil : पार्किंगसाठी सुसज्ज व्यवस्था

सभेसाठी येणाऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेता परभणी रोडवर शेरे यांचा शेतमळा, मंठा रोडवरील मणियार यांचे ले आऊट, परतूर -सातोना रोडवर श्रीनिवास आष्टीकर यांचे अशोक नगर परिसर, पुनर्वसन वसाहतीचा परिसर तर पाथरी रोडने येणाऱ्या वाहतुकीसाठी बोर्डीकर मैदान, मंत्री नगर ले आऊटच्या परिसरात पार्किंगची व्यवस्था केली आहे.

हेही वाचा 

Back to top button