

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : खेळाडूंना बोगस प्रमाणपत्र देत आहात, अशी 'वुशू' प्रशिक्षकाला धमकी देऊन अडीच लाखांच्या खंडणीची मागणी केली. हा धक्कादायक प्रकार २१ नोव्हेंबररोजी नक्षत्रवाडीतील एका हॉटेलात घडला आहे. याप्रकरणी २५ नोव्हेंबररोजी रात्री उशिरा सातारा पोलीस ठाण्यात खंडणीखोर अर्जून उत्तम पवार आणि योगेश नामदेव जाधव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैठण रोडवरील र्इटखेडामधील महेश कृष्णा इंदापुरे (३६) हे क्रीडा शिक्षक आहेत. र्इटखेडा गावात इंदापुरे यांचे खासगी कार्यालय आहे. तेथे वुशू या खेळाचे प्रशिक्षण व खेळाडूंना प्रवेश दिला जातो. सन २०१७ मध्ये खंडणीखोर अर्जून पवार आणि योगेश जाधव त्यांच्याकडे आले होते. या दोघांनी वुशू खेळाच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेत ४ ते ६ महिने प्रशिक्षण घेतले. याचकाळात दोघांनी इंदापुरे यांच्या कार्यालयातून डेटा असलेला पेनड्रार्इव्ह चोरुन नेला. त्यामुळे या दोघांकडे इंदापुरे यांनी पेनड्रार्इव्हची मागणी केली होती. परंतू दोघांनी तो दिला नाही.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यापासून दोघेही इंदापुरे यांना ब्लॅकमेल करण्यासाठी वारंवार फोन करु लागले. तर दुसरीकडे याच महिन्यात शासकीय जनमाहिती अधिकारी तथा उपसंचालक सुहास पाटील हे वुशू संघटनेच्या विरोधात असलेल्या खेळाडूंना कार्यालयात बोलावून त्यांना स्पर्धेच्या अहवालासंदर्भात माहिती अधिकारात अर्ज करण्याचे सांगितले जात होते. तसेच अवघ्या दोन तासांत आवक-जावक पत्र देखील दिले जात होते. हा गंभीर प्रकार ११ ऑगस्ट रोजी घडला होता. अनेकांनी माहिती अधिकारात अर्ज दिल्यानंतर त्याचे जावक पत्र मिळाल्याचे स्टेटस् व्हॉट्सअॅपला ठेवले होते.
यासंदर्भात इंदापुरे यांनी पुण्याच्या क्रीडा आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची प्रत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाठविण्यात आली होती. हा प्रकार समजल्यापासून पवार आणि जाधव इंदापुरेचा पिच्छा पुरवत होते. त्यातून त्यांना खोटे प्रमाणपत्र मिळवून देतो, असे धमकावत खंडणीची मागणी केली जात होती.
अर्जदाराकडून माहिती अधिकार अधिनियम २००५ चे कलम ६ (१) प्रमाणे अर्ज दाखल केला जातो. त्यानंतर कलम ६ नुसार त्रयस्थ पक्षाशी संबंधित माहिती आहे. अशावेळी त्या त्रयस्थ पक्षाला विचारणा करणे व त्याची प्रतिलिपी अर्जदाराला कळविणे गरजेचे असते. असे असतानाही क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी अवघ्या एक ते दोन तासांत आवक-जावकचे पत्र दिले आहेत. त्यामुळे पाटील यांच्याकडून वुशू खेळाला बदनाम करण्याचा डाव आखला गेल्याची तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, क्रीडा मंत्री आणि प्रधान सचिवांकडे करण्यात आली आहे. परंतु, अद्याप कोणतीही कारवार्इ याप्रकरणी झालेली नाही.
हेही वाचा