छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला पाणी सोडू नका; पाटबंधारेच्या पत्रानंतर मराठा समाज आक्रमक | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला पाणी सोडू नका; पाटबंधारेच्या पत्रानंतर मराठा समाज आक्रमक

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असल्याने मराठवाड्याला पाणी सोडण्यात येऊ नये, असे पत्र गोदावरी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सब्बीनवार यांनी शासनाला पाठविले होते. त्याच्या निषेधार्थ आज दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गोदावरी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात कार्यकारी संचालक एस. आर. तिरमवार यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. संबंधित अभियंत्यांना तातडीने निलंबित करून आजच जायकवाडी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात शांतते आंदोलन करणार्‍या मराठा समाजाला सतत बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात आता शासकीय कार्यालयातूनही या आंदोलनाला पुढे करून जाणूनबुजून वाद निर्माण केला जात असल्याचा प्रकार गोदावरी पाटबंधारे विभागाच्या पत्रावरुन पुढे आला आहे. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना देखील केवळ नगर, नाशिक येथील धरणातून जायकवाडीत पाणी सोडले जाऊ नये, यासाठी थेट मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बदनाम करण्याचे षडयंत्र गोदावरी पाटबंधारे विभागाने केला, असे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांकडून सांगण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाचे आंदोलन आणि मराठवाड्याला वरच्या धरणातून पाणी सोडणे, हे पूर्णपणे वेगळे आहे. मात्र, असे असताना देखील हे कारण पुढे करून जाणूनबुजून मराठा समाजाला बदनाम करण्यात आले आहे. त्यामुळे असे पत्र शासनाला पाठविणारे अधीक्षक अभियंता सब्बीनवार यांना तडकाफडकी निलंबित करून आजच जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात यावे.

न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आजच जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आंदोलक शैलैश भिसे पाटील, प्रा चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, रेखा वहाटुळे, सुकन्या भोसले, संदीप शेळके, संदीप जाधव, गणेश थोरात, विजय घोगरा, रविंद्र वहाटुळे यांनी केली.

असे आहे पत्र

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सध्याच्या स्थितीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येऊ नये, यासाठी पाणी सोडण्याची प्रक्रीया स्थगित करावी.

जाहीर माफी मागावी

हा प्रकार मराठा समाजाला बदनाम करणारा आहे. त्यामुळे या पत्रमागे असलेल्या सर्वांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

हेही वाचा : 

Back to top button