

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तर मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण उत्तराखंड, दक्षिण राजस्थान, पूर्व मध्यप्रदेशात देखील या दोन दिवसात गारपीटीची शक्यता (Hailstorm Alert) वर्तवण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती आजच्या (दि.२६) 'आयएमडी बुलेटीन'मध्ये दिली आहे. (Weather Forecast)
हवामान विभागाने २७ नोव्हेंबरपर्यंत गोव्यासह कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान २६ नोव्हेंबर रोजी धुळे, नंदुरबार, जळगांव, नाशिक, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असून वादळी पावसाची शक्यता आहे. २७ नोव्हेंबर रोजी अकोला, बुलढाणा वाशिम 'या' जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. (Hailstorm Alert)
IMD बुलेटीननुसार, शनिवारपासून (दि.२५) उत्तरेकडे चक्रीय स्थिती निर्माण होत आहेत. याचा प्रभाव महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये दिसून येणार आहे. महाराष्ट्रातील उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण भागातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुजरात, नैऋत्य मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये देखील २४ ते २७ नोव्हेंबरपर्यंत हीच स्थिती असणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी ही स्थिती अधिक जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि पश्चिम मैदानी प्रदेशातही २७-२८ नोव्हेंबर दरम्यान हलक्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. (Hailstorm Alert)