Weather Forecast | आजपासून राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता | पुढारी

Weather Forecast | आजपासून राज्यातील 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क: आजपासून (दि. २३) रविवारपर्यंत (दि.२६) राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा वायव्य आणि पश्चिम भारतावर परिणाम झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे, असे भारतीय हवामान विभागाने आज (दि.२३) सकाळी प्रसिद्ध केलेल्या बुलेटीनमध्ये म्हटले आहे. या संदर्भातील माहिती आयएमडी पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होशाळीकर यांनी देखील त्यांच्या X अकाऊंटवरून ट्विट करत दिली आहे. (Weather Forecast)

IMD बुलेटीननुसार, शनिवारपासून (दि.२५) उत्तरेकडे चक्रीय स्थिती निर्माण होत आहेत. याचा प्रभाव महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये दिसून येणार आहे. महाराष्ट्रातील उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण भागातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच गुजरात, नैऋत्य मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये देखील २४ ते २७ नोव्हेंबरपर्यंत हीच स्थिती असणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी ही स्थिती अधिक जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि पश्चिम मैदानी प्रदेशातही २७-२८ नोव्हेंबर दरम्यान हलक्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. (Weather Forecast)

Weather Forecast : तमिळनाडूसह केरळमध्ये मुसळधार

दक्षिण द्वीपकल्पीय भारतात चक्रीयवादळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तमिळनाडूसह केरळमध्ये पुढील २ ते ३ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर हळूहळू घट होईल, असे देखील हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान तामिळनाडूसह पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर केरळमध्ये देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा:

Back to top button