परभणी : सार्वजनिक कार्यक्रम टाळणार, विरोधानंतर आमदार गुट्टे यांची भूमिका | पुढारी

परभणी : सार्वजनिक कार्यक्रम टाळणार, विरोधानंतर आमदार गुट्टे यांची भूमिका

गंगाखेड, परभणी वृत्तसेवा : गंगाखेड शहर व परिसरात आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते ६ विकासकामांचा भूमिपूजन कार्यक्रम आज (दि.१०) सकाळी ११ वाजता होणार होता. परंतु, सकल मराठा आरक्षण समितीकडून हा कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न झाला. यावेळी भूमिपूजनविरोधी व मराठा आरक्षण समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, एका निवृत्त सुभेदाराकडून हे भूमिपूजन पार पडले.
तर समाजभावनेचा आदर ठेवत यापुढे उद्घाटनांसह सार्वजनिक कार्यक्रम पूर्णतः टाळणार असल्याची माहिती आमदार गुट्टे यांनी आज दुपारी १ वाजता पत्रकार परिषदेत दिली.

विकासकामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमांची पूर्वसूचना सकल मराठा आरक्षण समिती होती. त्यामुळे समितीचे अध्यक्ष श्रीकांत भोसले व पदाधिकाऱ्यांनी थेट भूमिपूजन स्थळ गाठून त्याठिकाणी भूमिपूजनाच्या विरोधात व मराठा समाज आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देऊन गोंधळ घालून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

अखेर कार्यक्रम संयोजकांनी मराठा समाजबांधवांच्या भावनेचा आदर करून इसादचे निवृत्त सुभेदार विश्वनाथ सातपुते यांच्या हस्ते भूमिपूजन करवून घेतले. यावेळी आ. गुट्टे मित्रमंडळ व रासप मित्रमंडळ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मी मराठा समाज बांधवांच्या भूमिकेशी सहमत असून समाजभावनेचा आदर आहे. स्वतःहून भूमीपूजनास जाणे टाळले. माजी सैनिकाच्या हातून भूमीपूजन करवून घेतले. मात्र, यापुढे जी कामे तांत्रिक पातळीवर भूमिपूजन करणे अत्यावश्यक आहेत. असे कार्यक्रम समाजातील ज्येष्ठ व्यक्ती, माजी सैनिक व वारकरी संप्रदायातील महाराजांच्या हस्ते करावीत, असे गुट्टे यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button