गेवराई, पुढारी वृत्तसेवा: गेवराई मतदारसंघाचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देण्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून मराठा आरक्षणासाठी माझा पाठिंबा आहे. आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस पेटत असून समाजाच्या भावना लक्षात घेत हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी रविवारी (दि.२९) खासदारकीचा राजीनामा दिला आहे. तर राज्यात ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत असून शासनाकडून कुठल्याच प्रकारची भूमिका घेतली जात नाही. दरम्यान, राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अशा परिस्थिती राजकीय नेते, पदाधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देऊन मराठा आरक्षणाच्या मागणीला बळ देऊ लागले आहेत. आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि महाराष्ट्रातील मराठा बांधवांच्या तीव्र भावनांची दखल घेत राजकीय नेते राजीनामा देऊ लागले आहेत.
हेही वाचा