भोर : पुढारी वृत्तसेवा : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भोरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू झाले. आमदार संग्राम थोपटे यांच्यासह अनेक मराठा बांधव या वेळी उपस्थित होते.
भोर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण रविवार (दि. 29) पासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात सुरू करण्यात आले. आमदार संग्राम थोपटे यांच्यासह तालुक्यातील 25 गावातील मराठा समाजबांधवांनी या उपोषणात सहभागी होऊन मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला.
मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकारने लवकरात लवकर मार्गी लावावा; अन्यथा होणार्या घटनेला आपण जबाबदार असाल, असे स्पष्ट करीत अंतरवाली सराटी येथील उपोषणाला भोर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने पाठिंबा देत असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी जाहीर केले. या उपोषणप्रसंगी ऋतुजा कोंढाळकर, अश्विनी कोंढाळकर, दत्तात्रय पासलकर, रामचंद्र बांदल यांनी मराठा आरक्षणाबाबत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल पवार यांनी केले.
मीदेखील मराठा आमदार : आ. थोपटे
आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून भोर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या उद्देशाने मी मराठा आमदार या नात्याने जाहीर पाठिंबा देत असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
राज्यकर्त्यांच्या फोटोंना फासले काळे
भोरमध्ये मराठा आरक्षणाचे आंदोलन उग्र होत आहे. काही उपोषणकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसवर असणार्या शासकीय जाहिरातींमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या फोटोंना काळे फासले.