

कळमनुरी, पुढारी वृत्तसेवा : जालना येथे मराठा समाजाच्या सभेहून परत गावी येणाऱ्या युवकाचा मोटर सायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.१४) रात्री ११ च्या सुमारास सिंदगी गावाजवळ घडली. कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तुकाराम येथील मंगेश संभाजी काळे (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मनोज जरांगे यांची अंतरवली सराटी येथे शनिवारी मराठा समाजासाठी जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेसाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव पोहोचले होते. कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तुकाराम येथील २० वर्षीय युवक मंगेश संभाजी काळे आपल्या मित्रासोबत मोटर सायकलवरून (MH 38 AE 5041) सभेला गेला होता. सभेनंतर आपल्या गावी परत येत असताना सिंदगी गावाजवळ वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी घसरली. यात मंगेश याचा जागीच मृत्यू झाला. तर सचिन बालाजी काळे (वय २०) याला गंभीर दुखापत झाली. त्याला नांदेड येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
मृत मंगेश याच्या मागे आई- वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. मंगेश शिक्षण घेत होता. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा