Manoj Jarange-Patil | सरकारकडे १० दिवस उरलेत, मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मागे हटणार नाही : मनोज जरांगे पाटील | पुढारी

Manoj Jarange-Patil | सरकारकडे १० दिवस उरलेत, मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मागे हटणार नाही : मनोज जरांगे पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची तोफ आज अंतरवाली सराटीत धडाडली. विराट संख्येने उपस्थित असलेल्या मराठा बांधवांना संबोधित करताना जरांगे पाटील यांनी मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा राज्य सरकारला दिला. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीत समावेश करावा, अशी मराठा समाजाची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे ४० दिवसांपैकी १० दिवस उरलेत. त्यामुळे १० दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. (Manoj Jarange-Patil)

Manoj Jarange-Patil | १० दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्या

आज अंतरवाली सराटीत मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी महासंवाद मेळावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी ते बोलत असताना म्हणाले की, “मराठा समाज एक होत नाही असं बोलणाऱ्यांना या गर्दीने उत्तर दिलं आहे. कोण म्हणतो मराठा एक होत नाही. यांना ते समाजावून सांगा आरक्षण घ्यायला आला की कशाला आला आहात. पुढे बोलत असताना ते म्हणाले की,”आपल्या मराठा समाज्याची मूळ मागणी आरक्षण आहे. नेमकं कोण आहे जे मराठ्यांच्या  लेकरांच्या भविष्याच्यामध्ये येत आहे?  नेमक कोण आरक्षण देत नाही हे ऐकण्यासाठी कानाकोपऱ्यातून लोक आले आहेत. सरकारला विनंती आहे की, तुमच्या हातात ४० दिवसांपैकी १० दिवस हातात उरलेले आहेत. आज जो जनसागर उसळला आहे त्यांची ही मागणी आहे की, राहिलेल्या १० दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्यावे.

Manoj Jarange-Patil | काय आहेत  जरांगे पाटील यांच्या मागण्या

उपस्थितांना संबोधताना जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्या सांगितल्या त्या पुढीलप्रमाणे,

  • महाराष्ट्रातील समस्त मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे.
  • मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा.
  • कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी.
  • मराठा समाजासाठी बलिदान देणाऱ्या ४५ बांधवांना सांगितलेला निधी व सरकारी नोकरी द्यावी.
  • दर १० वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवाचा सर्व्हे करावा आणि प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात.
  • सारथी संस्थेमार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देवून त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावावेत.
  • मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करुन आरक्षण दिलं तरीही चालेल पण टिकणारं आरक्षण हवं आहे.
  • जरांगे पाटील यांच्या मातोश्रीही मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

४० व्या दिवशी काय ते सांगू…

जरांगे-पाटील म्हणाले की, मी काही भाषण देणार नाही तर आपल्या लेकरा बाळांच्या भविष्यासाला हात घालणार आहे. आजची सभा म्हणजे हा सुवर्ण क्षण आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील व्यक्ती या ऐतिहासिक सभेचा साक्षीदार  झाला आहे. ही लोक आयुष्यभर गर्वाने छाती ठोकून म्हणणार आहेत की, मी माझ्या नातवासाठी या सभेला होतो. पुढे बोलत असताना ते म्हणाले की,” मराठा समाजाने ४० दिवस सरकारला एकही प्रश्न विचारला नाही. तुमच्या हातात आणखी १० दिवस आहेत. जर या १० दिवसात आरक्षण दिल नाही तर ४० व्या दिवशी काय ते सांगू आम्ही. माझा मराठा समाज शांततेत आला आहे आणि दिलेल्या  शब्दाप्रमाणे शांतेत परत जाणार आहे.

जाहीरपणे विनंती…

जरांगे-पाटील यांनी सभेत जाहीरपणे विनंती सरकारला केली. ते म्हणाले,”जाहीरपणे विनंती करुन सरकारला सांगत आहोत, मराठा समाजासाठी गठीत केलेली समितीच काम बंद करा. ५ हजार पानांचा पुरावा मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी पुरेसा आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे अद्याप मागे घेतलेले नाहीत. हेही यावेळी त्यांनी सांगितले.

आरक्षण मिळाल्याशिवाय एकही इंचही मागे हटणार नाही

आरक्षण मिळाल्याशिवाय एकही इंचही मागे हटणार नाही. असं म्हंणत त्यांनी आता १० दिवसांपेक्षा वाट बघण्याची क्षमता आमची तयारी नाही आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितजी शाह यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळांना आणि राज्यसरकारला हात जोडून विनंती आहे की, या मराठा समाजाची हालअपेष्ठा करु नका. गोरगरिब समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करुन घेण्यासाठी केंद्राने आणि राज्याने समिती स्थापन करुन सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. पुढे बोलत असताना ते म्हणाले की,” मराठा समाजाच आग्या मोहळ शांत आहे. जर का हे उठलं तर आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही.

सदावर्ते, भुजबळांवर निशाणा

सभेसाठी ७ कोटी खर्च केल्याचा आरोप अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांचा होता. या पार्श्वभुमीवर भुजबळांचे नाव न घेता जरांगे-पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, ” माझा मराठा समाज शेतात काबाडकष्ट  करतो. १२३ गावांमधील माझ्या मायबाप लोकांनी निधी गोळा करुन  २१ लाख जमा केले. आणि महाराष्ट्रातुन या सभेसाठी येणाऱ्या मराठा लोकांची सेवा केली. घाम गाळून सभेसाठी पैसे गोळा केले. पुढे बोलताना त्यांनी भुजबळ यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली, ते म्हणाले की.” ज्या मराठ्यांनी मोठं केलं त्यांचे पैसे खावून त्या मंत्र्यांनी पैसे खाल्ले.

यावेळी त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही जहरी टीका केली. ते म्हणाले की,”गुणरत्न सदावर्ते यांना उपमुख्यमंत्री यांनी समज द्यावी, माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही म्हटल्यावर मी काही बोललो नाही. मराठ्यांना हुसकवा अस भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते यांना सांगण्यात आलं आहे अस समजत आहे. असं म्हणतं त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवाहन केले आहे की, भूजबळांना आवर घाला. यावेळी त्यांनी सरकराने आपलं  फेसबुक अकाउंट बंद केलं असल्याचा आरोपही केला.

२४ ऑक्टोबर नंतर मराठा समाज मागे हटणार नाही

सरकारने आरक्षणाचा निर्णय गांभिर्याने घ्या अस सांगत, हा लढा पैश्यासाठी नसुन हा लढा न्यायासाठी आहे, मराठ्यांच्या वाट्याला जावू नका, आम्हाला राजकारण नको आहे, आम्हाला आमच्या लेकरांच भविष्य  हवं आहे असं जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले. “१० दिवसात आरक्षण द्या, अन्यथा पुढची जबाबदार सरकारची असेल. येत्या २४ ऑक्टोबरला सांगण्यात येईल की पुढच्या आंदोलनाची दिशा काय असेल. पण हे आंदोलन शांतेत होणार हा माझा शब्द आहे” असेही ते म्हणाले.

एक तर माझी अंत्ययात्रा किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची विजययात्रा

जर का मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर,  टोकाच उपोशण करणार. एक तर माझी अंत्ययात्रा निघेल नाही तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजययात्रा निघणार. पण मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. आता आमची सहन करण्याची क्षमता संपलेली आहे. मराठ्यांनो सज्ज व्हा. २४ ऑक्टोबर नंतर मराठा समाज मागे हटणार नाही, मराठ्यांनो गाफील राहू नका. असही ते म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button