Chh. Sambhajinagar News: पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी | पुढारी

Chh. Sambhajinagar News: पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी

पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण तहसीलदार सारंग चव्हाण यांना पाणीटंचाईच्या बैठकीत आज (दि.१३) शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात अंतरवाली खांडी येथील एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Chh. Sambhajinagar News)

याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील अंतरवाली खांडी येथे दुपारी पाणीटंचाई संदर्भात बैठक बोलावली होती. यावेळी पंचायत समिती प्रशासन अधिकारी राजेश कांबळे, ग्रामसेवक प्रतिभा मुंडे, तहसीलदार सारंग चव्हाण उपस्थित होते. यावेळी विश्वनाथ नामदेव हांडे (रा. अंतरवाली खांडी) याने ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीमध्ये येऊन मोठमोठ्याने आरडाओरड केली. बैठकीसाठी तुम्ही यावेळी का आला आहात. सकाळी का नाही आला, असे विचारून तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या हातातील व्हिजीट बुक हिसकावून घेतले. (Chh. Sambhajinagar News)

त्यानंतर तहसीलदार वाहनात बसत असताना त्याने शिवीगाळ करून वाहनावर दगड मारला. तुम्ही बाहेर या तुमच्याकडे बघतो, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तहसीलदार सारंग चव्हाण यांनी पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष माने यांनी विश्वनाथ हांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button