जिंतूर, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील अकोलीजवळ आज (दि. २७) सकाळी ९ वाजता रानडुकराच्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत आमदार मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांनी तत्काळ मदत करून स्वतःच्या गाडीतून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील अकोली येथील बालासाहेब सडाळ (वय 56) हे आपल्या दुचाकीवरून गावाकडे येत होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला रानडुकराने जोराची धडक दिल्याने ते खाली कोसळले. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी आमदार मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) आपल्या नियोजित दौऱ्या निमित्त जात असताना त्यांना बालासाहेब जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांनी तत्काळ आपली गाडी थांबवून त्यांना रूग्णालयात दाखल केले.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष अॅड. विनोद राठोड यांना जखमीसोबत ग्रामीण रुग्णालयात पाठवले. दरम्यान, आमदारांनी आपला नियोजित दौरा असताना जखमी व्यक्तीला मदत केल्याने जखमीवर वेळेत उपचार मिळू शकले.
जिंतूर -चारठाणा महामार्गावर रानडुकराच्या धडकेने दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. यापूर्वी जोगवाडा येथून रात्री चारठाणा येथे दुचाकीवरून जात असताना याच मार्गावरील गजानन मंदिराजवळ रानडुकराच्या धडकेने दुचाकीवरील जोगवाडा येथील भारतर रथकर व भास्कर रथकर या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच अकोलीजवळ जोगवाडा येथीलच खडू म्हस्के यांच्याही दुचाकीला रानडुकराची जबर धडक बसल्याने हात फॅक्चर झाला होता.
हेही वाचा