नांदेड-नागपूर महामार्गावर बामणी फाटा येथे रास्ता रोको, वाहतूक ठप्प | पुढारी

नांदेड-नागपूर महामार्गावर बामणी फाटा येथे रास्ता रोको, वाहतूक ठप्प

हदगाव (जि. नांदेड) : पुढारी वृत्तसेवा – नांदेड-नागपूर महामार्गावर तालुक्यातील बामणी फाटा येथे मराठा समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. दि. ४ रोजी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागून काही तास वाहतूक ठप्प झाली होती.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मागील सात दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने उपोषण चालू होते. त्याठिकाणी पोलीस प्रशासन मोठ्या संख्येने जमा होऊन तेथील आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर बेछूट लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर करण्यात आला. शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असलेल्या महिला, बालक, वृद्ध आणि युवकांना नाहक मारहाण केली. या क्रूर घटनेमुळे मराठा समाजात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेचा निषेध करून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.

मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना दि. ३ रोजी बामणी फाटा येथील अनिल पवार, बालाजी चव्हाण, किसनराव मोरे, अरुण चव्हाण, मनोज चव्हाण, सोपान पुयड, कन्हैया आनेराव परमेश्वर चौतमाल यांनी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिले होते.

सकाळी ११ वाजता नांदेड-नागपूर महामार्गावर बामणी फाटा येथे मराठा समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली होती. या रास्ता रोको आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (उद्धव ठाकरे गट) नागेश पाटील आष्टीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) बाबुराव कदम हे देखील सहभागी झाले होते. तसेच हदगाव व बामणी फाटा येथील व्यापाऱ्यांनी आपआपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मनोज पाटील जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून हदगाव येथील तहसील कार्यालयासमोर दि. २ रोजी पासून तालुक्यातील हडसणी येथील दत्ता पाटील सूर्यवंशी हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

Back to top button