बीड : तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त वैजनाथाच्या दर्शनाला अलोट गर्दी | पुढारी

बीड : तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त वैजनाथाच्या दर्शनाला अलोट गर्दी

परळी वैजनाथ; रविंद्र जोशी : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या  प्रभु वैजनाथाच्या नगरीत तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. परळी वैजनाथ येथे तिसऱ्या सोमवारी दर्शन घेण्यासाठी महत्त्व असल्याने आज भाविकांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.

परळीत रविवारीच प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मोठा ओघ सुरू झाला होता. दर्शन रांगेत कालपासूनच भाविकांची गर्दी पहावयास मिळत होती. आज सकाळी यामध्ये मोठी वाढ  झाली. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला. मोठ्या संख्येने भाविक दाखल होणे अपेक्षित असल्याने श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.

पंचक्रोशीतील शिवालये गजबजली

तालुक्यातील जिरेवाडीचे सोमेश्‍वर, तपोवनचे रामेश्‍वर, टोकवाडीचे रत्नेश्‍वर, धर्मापुरीचे मल्लिकार्जुन, मालेवाडीचे अंधारेश्‍वर या  ग्रामीण भागातील शिवालयांमध्येही भक्तांनी दिवसभर गर्दी केल्याचे दिसत होते. परळी शहरातील संत जगमित्रनागा, गुरूलिंग स्वामी मंदिर, सुर्वेश्‍वर मंदिरासह विविध महादेव मंदिरांत भक्तांची गर्दी झाल्याचे पाहावयास मिळत होते.

भजन, कीर्तन व हरिनामाचा गजर

परळी तालुक्यातील विविध गावांमधून भाविकांनी येऊन दर्शनाचा लाभ घेतला. तसेच भजन, कीर्तन यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंत्रमुग्ध होऊन भाविक भक्तीभावाने भजनात रममाण झाल्याचे चित्र मंदिरे व परिसरात दिसून येत होते.

मंदिर परिसर भाविकांनी गेला फुलून

प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र परळी सोमवार निमित्ताने गजबजले होते. वैद्यनाथ मंदिरासह शहरातील विविध मंदिरे भाविकांनी गजबजून गेली होती. दर्शनासाठी भाविकांनी विविध मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली होती. परळीच्या पंचक्रोशीतील हजारो भाविक सकाळपासूनच परळीत दाखल होत होते. बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या भाविकांनी रांगा लावून प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले. दिवसभर मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे.

हेही वाचा : 

Back to top button