छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : पिसादेवी रोडवरी प्लॉटची मोजणी केल्यावर मोजणी नकाशा देण्यासाठी एक लाख दहा हजार रुपये लाचेची मागणी करून ६० हजार रुपये स्वीकारणाऱ्या दोन भूमापकांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) हडको भागात मंगळवारी (दि.२९) भूमिअभिलेख विभागात ही कारवाई केली. या प्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे यांनी दिली.
सचिन बाबुराव विठोरे (वय ३५) आणि किरण काळुबा नागरे (वय ४३) अशी आरोपींची नावे आहेत. अधिक माहितीनुसार, तक्रारदार यांचा पिसादेवी रोडवर प्लॉट आहे. त्या प्लॉटची सरकारी मोजणी करण्यासाठी त्यांनी भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. त्यानुसार, भूमापक सचिन विठोरे आणि किरण नागरे यांनी मोजणी केली.
दरम्यान, मोजणीचा नकाशा देण्यापूर्वी त्यांनी तक्रारदार यांना एक लाख १० हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच ५० हजार रुपये तत्काळ घेतले. उर्वरित ६० हजार रुपयांसाठी विठोरे आणि नागरे यांचा तक्रारदाराकडे तगादा सुरु होता. लाचेची रक्कम दिल्याशिवाय मोजणी नकाश मिळणार नाही, असे सुनावले.
त्यामुळे तक्रारदार यांनी एसीबीकडे धाव धेतली. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे यांनी पोलीस निरीक्षक हनुमंत वारे, नंदकिशोर क्षीरसागर यांना सापळा कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. विठोरे याने ६० हजारांची लाचेची रक्कम स्वीकारली. त्यानंतर पथकाने विठोरे आणि नागरे या दोघांनाही अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक हनुमंत वारे, अंमलदार तोडकर, नागरगोजे, पाठक आणि आघाव यांच्या पथकाने केली.
हेही वाचा;