मुख्याध्यापकाकडून विनयभंग : विद्यार्थीनींनी मुख्‍यमंत्री योगींना लिहिले रक्‍ताने पत्र | पुढारी

मुख्याध्यापकाकडून विनयभंग : विद्यार्थीनींनी मुख्‍यमंत्री योगींना लिहिले रक्‍ताने पत्र

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधील एका शाळेतील धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील विद्यार्थींनीनी मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांना रक्‍ताने लिहिलेले पत्र समोर आले आहे. यामध्‍ये शाळेच्‍या मुख्याध्यापकावर विनयभंगाचा आरोप करण्‍यात आला आहे. गाझियाबाद पोलिसांनी  मुख्याध्यापकाला अटक केली असल्‍याचे वृत ‘फर्स्टपोस्ट’ने दिले आहे.

शाळेतील चार विद्यार्थींनीनी CM योगींना रक्‍ताने पत्र लिहिले आहे. यामध्‍ये मुख्याध्यापक राजीव पांडे यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. पांडे याने  विद्यार्थींनींना कार्यालयात बोलावून घेत गैरवर्तन  केले. याची माहिती कोणाला दिली तर जीवन उद्‍ध्‍वस्‍त करू, अशी धमकीही ताे देत असे. या धमकीमुळे अनेक मुलींनी तक्रार केली नसल्‍याचे त्‍यांनी पत्रात नमूद केले आहे.

बाबाजी, आम्हाला न्याय द्या…

पत्रात विद्यार्थींनीनी म्‍हटले आहे की, मुलींनी २१ ऑगस्ट रोजी घरी घडलेल्‍या प्रकाराची माहिती दिली. यानंतर पालकासह  नगरसेविका परमोश यादव यांनी शाळेत जावून जाब विचारला. यावेळी मुख्‍याध्‍यापक पांडे याने सर्वांना शिवीगाळ केली.  पीडित मुलींच्‍या संतप्‍त झालेल्‍या नातेवाईकांनी मुख्याध्यापकाला बेदम चोप दिला. यानंतर वेव्ह सिटी पोलिस ठाण्यात एसीपी सलोनी अग्रवाल यांनी आम्हाला खूप शिवीगाळ केली. तसेच चार तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. आजपर्यंत मुख्याध्यापकांवर कारवाई झालेली नाही. पोलिस रोज आमच्या घरी येऊन तक्रार मागे घेण्‍यासाठी धमकी देतात. आम्‍हाला घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. शाळेच्या व्यवस्थापकाने आम्हाला शाळेत येण्यास मनाई केली आहे. बाबाजी, आम्ही सर्व तुमच्या मुली सारख्‍या आहोत. आम्हाला न्याय द्या.”, अशी मागणीही विद्यार्थींनीनी  रक्‍ताने लिहिलेल्‍या पत्रातून करण्‍यात आली आहे.

गाझियाबादमधील विद्यार्थींनीनी रक्‍ताने लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्‍यहारल झाल्‍यानंतर मुख्याध्यापकाने अनेक मुलींच्या पालकांवर शारीरिक अत्याचाराचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. दरम्‍यान,. मुलींच्या तक्रारीच्या आधारे मुख्याध्यापकावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती एसीपी सलोनी अग्रवाल यांनी दिली. विनयभंगापासून ते अयोग्य स्पर्श करण्यापर्यंतचे आरोप पांडे याच्‍यावर आहेत. तपासात मंगळवारी सकाळी मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे जनक्षोभ उसळला आहे,

अखिलेश यादव यांनी व्‍यक्‍त केली चिंता

या घटनेवर समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी ट्विटरद्वारे चिंता व्यक्त केली आहे. मुलींनी दाखल केलेल्या एफआयआरला संबोधित करण्यात उशीर झाल्याबद्दल सवाल केला आहे. तसेच पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या गैरवर्तन प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

 

 

Back to top button