उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर संतोष बांगर मैदानात; हिंगोलीतील सभेला तुफान गर्दी | पुढारी

उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर संतोष बांगर मैदानात; हिंगोलीतील सभेला तुफान गर्दी

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे यांनी रविवारी हिंगोलीत सभा घेत स्थानिक आमदार संतोष बांगर यांच्यासह शिंदे गटावर निशाणा साधला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संतोष बांगर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत ठाकरेंवर पलटवार केला. संतोष बांगर यांनी कावड यात्रेचे आयोजन केले होते. या कावड यात्रेत बांगर यांच्यावर प्रेम करणारे हजारो समर्थक सहभागी झाले होते. अक्षरश: लोकांच्या गर्दीने रस्ता खचाखच भरलेला होता. त्यात एका वाहनाच्या टपावर आमदार संतोष बांगर आणि कालिचरण महाराज होते.

उद्धव ठाकरेंच्या टीकेवर आमदार संतोष बांगर म्हणाले की, भगवा कधीही सोडणार नाही. एक जिल्हाप्रमुखाने ५ पक्ष बदलले आहेत. ते म्हणतात आम्ही निष्ठावंत आहोत. काल कुणीतरी आम्हाला म्हटले की हा नाग आहे. पण हा नाग भोळ्या शंकराच्या गळ्यातला आहे. नागाने फणा मारला, शंकराने तिसरा डोळा उघडला तर तुम्ही भस्म व्हाल, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

तसेच हे शक्तीप्रदर्शन नाही, हे शिवभक्त आहेत. हिंदुत्वाला मानणारे आहेत. ही प्रेम करणारी जनता आहे. ही जनता भोळ्या शंकरावर प्रेम करणारी, भगव्या ध्वजावर प्रेम करणारी आहे. हिंदुत्ववादी विचारांची कावड आहे. याचे दर्शन महाराष्ट्राला दाखवावे. वाशिम, यवतमाळ, नांदेड, जालना, परभणी या ठिकाणाहून ठाकरेंच्या सभेला गर्दी करण्याचा प्रयत्न केला तरी सभेचा मांडव भरला नाही. परंतु आज ही लोकांची गर्दी बघताय ती हिंगोलीतल्या लोकांची आहे, असेही आमदार संतोष बांगर या वेळी बोलताना म्हणाले.

हेही वाचलंत का?

Back to top button