Tuljapur : तुळजाभवानी मंदिर परिसर प्रशस्त करण्यावर आराखड्यात भर | पुढारी

Tuljapur : तुळजाभवानी मंदिर परिसर प्रशस्त करण्यावर आराखड्यात भर

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानी  मंदिराच्या विकासाचा प्राथमिक आराखडा तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी नुकताच सादर केला. या आराखड्यावर उपस्थित नागरिकांनी महत्त्वाच्या सूचना मांडल्या.
तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ग्रंथालय इमारतीमध्ये ही बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे, अपर जिल्हाधिकारी शिंदे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, तुळजाभवानी पुजारी मंडळ अध्यक्ष अमरराजे कदम, उपाध्य मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, तहसीलदार अरविंद बोळंगे, मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, पोलीस निरीक्षक घाडगे, राजकुमार भोसले यांची उपस्थिती (Tuljapur)  होती.

तुळजाभवानी मंदिराच्या विकासाच्या आराखड्याचे प्राथमिक सादरीकरण जिल्हाधिकारी ओंबासे यांनी करताना तुळजाभवानी मंदिर परिसर मोठा करण्याच्या अनुषंगाने दक्षिण आणि उत्तर दोन्ही बाजूंनी असणाऱ्या दगडी कमानी मागे घेऊन दोन्ही बाजूंनी भाविकांना वावरण्यासाठी परिसर मोठा करण्याचा प्रस्ताव ठेवला. घाटशील पार्किंग येथून सर्व भाविकांना प्रवेश देणे, अभिषेक आणि दर्शन दोन्ही दर्शन मंडप याच जागेवर नियोजित आहेत. याशिवाय आरादवाडी या भागात असणाऱ्या पार्किंग पासून दर्शन मंडपपर्यंत भाविकांना येण्यासाठी सुविधा असणार आहेत. येथे तीन वेगवेगळ्या लिफ्ट द्वारे दर्शन मंडपात सोडण्याची नियोजन केले आहे. (Tuljapur)

गोमुख तीर्थपासून निंबाळकर दरवाजापर्यंत परिसर मोकळा करण्याचा यामध्ये समावेश आहे. जामदार खान्यापासून शिवाजी दरवाजापर्यंत परिसर देखील खुला करण्यात येणार आहे. संभाजी प्रांगण आणि दक्षिणेकडील दरी हा परिसर देखील मंदिराचा भाग म्हणून विकसित करण्यात येनार आहे. सर्व मार्गांनी मंदिर परिसर मोठा करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. भाविकांना वावरण्यासाठी जास्तीत जास्त जागा उपलब्ध करण्याचा या आराखड्यात समावेश आहे.

भवानीशंकर आणि चांदीचा दरवाजा दरम्यान असणारी भिंत काढली जाणार असून येथून चार पदरी दर्शन रांगा सुरु राहतील. दर्शन मंडपातून फक्त वरती आल्यानंतर त्याला सरळ देवीचे दर्शन होणार असल्याचे या आराखड्यात सांगितले गेले आहे. मंदिराच्या विकास आराखड्यामध्ये हा सर्वात महत्त्वाचा विषय या बैठकीत चर्चेला आला. आदिमाया आदिशक्ती मंदिर ते जुने प्रशासकीय इमारत दरम्यान असणारी मोठी प्राचीन भिंत काढून त्या परिसराला मोठे करण्याचा देखील या प्रस्तावामध्ये समावेश आहे. यामुळे आदिमाया आदिशक्तीचा मंदिर परिसर देखील तुळजाभवानी मंदिरामध्ये आमने-सामने येणार आहे.

गोकुळ शिंदे, सचिन रोचकरी, अविनाश गंगणे, प्रा. सतीश कदम, किशोर गंगणे, हेमंत कांबळे, सुयोग अमृतराव, अजय साळुंखे, प्रशांत सोनजी, दयानंद हिबारे, उत्तम अमृतराव, इंद्रजीत साळुंखे, अमित उदाजी कदम, शांताराम पेंदे आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button