बीड: चोपनवाडी-परळी रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको | पुढारी

बीड: चोपनवाडी-परळी रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको

दिंद्रुड, पुढारी वृत्तसेवा: माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी येथील खराब रस्त्याप्रकरणी स्वातंत्र्य दिनी आज (दि.१५) बीड – परळी महामार्गावर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. बांधकाम विभागाचे अभियंता व पोलिसांनी मध्यस्थी केल्याने तात्पुरते हे आंदोलन मागे घेण्यात आले.

माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी ते बीड, परळी या रस्त्याला मंजुरी मिळून जवळपास चार वर्षे लोटत आले आहेत. मात्र अद्याप या रस्त्याचे काम न झाल्याने अनेक अडचणींना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बीड- परळी हायवे ते चोपनवाडी या पावणे तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली. जवळपास एक कोटी तीस लाख रुपये मंजुर झाले. मात्र, गेल्या चार वर्षांपासून रस्त्याचे काम न झाल्याने अनेक हालअपेष्टा चोपणवाडी ग्रामस्थांना भोगाव्या लागत आहेत. चोपनवाडी ते बीड परळी हायवेवर येताना जवळपास अर्धा ते पाऊण तास वेळ लागतो. अनेक विद्यार्थ्यांना केवळ रस्ता खराब असल्याने शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. अबालवृद्ध, रुग्णांना प्रचंड शारीरिक व मानसिक त्रास या खराब रस्त्यामुळे सहन करावा लागत आहे.

शासन-प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने चोपनवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत स्वातंत्र्यदिनी बीड परळी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. गावातील विद्यार्थ्यांसह महिला, अबालवृद्ध या आंदोलनात सहभागी झाले होते. बांधकाम विभाग बीडचे कार्यकारी अभियंता फड यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. दिंद्रुड पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.

हेही वाचा 

Back to top button