बीड : पावसाचा दगा; खरीप हंगाम संकटात, यंदा कोरड्या दुष्काळाच्या पाऊलखुणा

पावसाचा दगा
पावसाचा दगा
Published on
Updated on

टाकरवण; पुढारी वृत्‍तसेवा सततच्या अस्मानी संकटामुळे गेल्या खरीप व रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. अर्थात यंदा पुन्हा मोठ्या हिमतीने कर्ज काढून व उधार उसनवारी करून शेतकऱ्यांनी खरिपात-काळ्या आईची ओटी भरली. मात्र यंदा पुन्हा निसर्गाने दगाफटका केला. पावसाळ्याचे ऐनभराचे दोन महिने उलटले तरी जेमतेम पाऊस झाला आहे. त्यात अनेक ठिकाणी खरीप पिकांची वाढ खुंटली असून, काही ठिकाणी तर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. एकूणच मागील तीन वर्षे ओला तर आता कोरडा दुष्काळ दबक्या पावलांनी प्रवेश करीत आहे.

माजलगांव तालुक्यात तशी २०१२ पासून कोरड्या दुष्काळाची मालिका सुरु आहे. मध्यंतरी २०२० ते २०२२ अशी तीन वर्षे अतिवृष्टी, गारपीट आणि अवकाळी पावसाचा मारा सहन करावा लागला. त्यात काही मंडळात पिकेच काय तर जमिनीची मातीही वाहून गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दोन्ही सुगी हंगामाचे कमालीचे नुकसान होऊन शेतकरी कंगाल झाला. यावर्षी पुन्हा शेतकरी नुकसानीचे दुःख विसरून उधार उसनवारी तर कुठे कर्ज काढून शेतात खरीप पेरणी केली.

जून महिना तसा कोरडा गेल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या उरकल्या. पिकांची उशिरा लागवड झाली. त्यात पिके उगविण्याच्या काळातच पावसाने दडी दिल्याने कोवळ्या पिकांची वाढ खुंटली आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. आता पुढचे चार दिवस पाऊस आला नाही, तर काही क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट ओढावणार असल्याची परिस्थिती निर्माण होत आहे.

शेतकऱ्यांना मदतीचा हात गरजेचा

यंदा सरासरीपेक्षा निम्म्याहून कमी पाऊस झाल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. अशा परिस्थितीत शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा. शिवाय मागच्या वर्षीचे अतिवृष्टी आणि सातत्याने झालेल्या नुकसानीचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा. शिवाय यंदा झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news