नांदेड : विवाहितेस जिवंत जाळणाऱ्या सासू, दीरास जन्मठेपेची शिक्षा | पुढारी

नांदेड : विवाहितेस जिवंत जाळणाऱ्या सासू, दीरास जन्मठेपेची शिक्षा

बिलोली, पुढारी वृत्तसेवा : दिसायला सुंदर नसल्याचे कारण देत बिजूर येथील विवाहितेवर रॉकेल ओतून जिवंत जाळणाऱ्या सासू व दीरास जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रू. दंड आणि दंड न भरल्यास तीन महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, आमडापूर तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील धर्माजी हेडे यांची मुलगी पूजा हिचा विवाह बिलोली तालुक्यातील बिजूर येथील रामराव राचूरे यांचा मुलगा प्रमोद राचूरे याच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर नवविवाहिता पूजा हिस तू दिसायला सुंदर नाहीस म्हणून सासरच्याकडून त्रास दिला जाऊ लागला. अशातच दि.२८ जुलै २०१६ रोजी सकाळी ६ वा.दरम्यान सासू सरस्वतीबाई राचूरे व दीर प्रसाद राचूरे यांनी तू दिसायला सुंदर नाहीस या कारणाने भांडण करून विवाहिता पूजा हिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. ज्यात पूजा ही गंभीररित्या भाजली गेली. तिला पुढील उपचारासाठी नांदेड येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु दि.२९ जुलै २०१६ रोजी उपचारा दरम्यान पूजा हिचा मृत्यू झाला.

मयत पूजा हिच्या मृत्यूपूर्व जबाबवरून रामतीर्थ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला. तपास अधिकारी स. पो. नि. दिलीप गाढे यांनी सदरील प्रकरणाचा तपास करून बिलोली जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सदरील प्रकरणात एकूण आठ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. त्यानुसार सदरील प्रकरणातील आरोपीना दोषी ठरवून दि.०४ ऑगस्ट २०२३ रोजी बिलोली जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी यातील आरोपी प्रसाद राचूरे व सरस्वतीबाई रामराव राचूरे यांना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रू. दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदरील प्रकरणात सरकार पक्षाकडून ऍड. संदीप कुंडलवाडीकर यांनी सक्षम बाजू मांडली.

हेही वाचलंत का?

Back to top button