जालना: भोकरदन येथे पत्रकार संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा निषेध | पुढारी

जालना: भोकरदन येथे पत्रकार संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

भोकरदन: पुढारी वृत्तसेवा: पाचोरा येथील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी पाचोरा येथे आज (दि.११) केलेल्या जीवघेणा हल्ल्यात पत्रकार संदीप महाजन जखमी झाले. आमदार किशोर पाटील यांच्याकडून आपणास आणि आपल्या कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याची तक्रार महाजन यांनी पोलिसांत केली आहे.

दरम्यान, तालुका पत्रकार संघाच्या वतीने आमदार किशोर पाटील यांचा निषेध केला आहे. पाटील यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करून राज्यपालांनी त्यांची आमदारकी रद्द करावी, या मागणीसाठी भोकरदन तालुका पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारी (दि.११) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन केले. यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ. दयानंद जगताप यांना निवेदन देण्यात आले. या धरणे आंदोलनास स्वराज्य संघटना,  अखिल भारतीय छावा संघटना, लोकजागर संघटना, आम आदमी पार्टीने जाहीर पाठिंबा दिला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा येथील एका घटनेच्या संदर्भात संदीप महाजन यांनी बातमी दिली होती. त्याचा राग धरून किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना चार दिवसांपुर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती. ही क्लीप व्हायरल झाल्यावर आमदारांनी साळसुदपणे शिवीगाळीचे समर्थन देखील केले होते.

दरम्यान, गुरुवारी संदीप महाजन रेल्वे आंदोलनाची बातमी कव्हर करून घरी परतत असताना चार पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. नगरपालिकेसमोर ज्या चौकात हल्ला झाला. तो चौक महाजन यांचे स्वातंत्र्यसैनिक वडिलांच्या नावाने ओळखला जातो. येथेच त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली गेली. महाजन त्यात गंभीर जखमी झाले आहेत. महाजन यांनी पोलिसांत तक्रार दिली असून किशोर पाटलांनीच आपल्यावर गुंडाकरवी हल्ला केल्याची तक्रार केली आहे.

यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष फकीरा देशमुख, जिल्हा कार्यकारणी सदस्य, तालुकाध्यक्ष दीपक सोळंके,  सचिव सुरेश बनकर आदीसह ग्रामीण भागातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button