Haryana Nuh Violence: आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तणावपूर्ण परिस्थिती कायम, ३० गुन्हे दाखल | पुढारी

Haryana Nuh Violence: आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, तणावपूर्ण परिस्थिती कायम, ३० गुन्हे दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणातील नूह (Haryana Nuh Violence) येथील जलाभिषेक यात्रेदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद हरियाणातील अनेक शहरांत उमटू लागले आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर नूह येथील परिस्थिती तणावपूर्ण आहे. आरोपींना पकडण्यासाठी आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी निमलष्करी दलाची २० पथके आणि पोलिस दलाची २० पथके तैनात करण्यात आली आहेत.

नूहमध्ये (Haryana Nuh Violence) कर्फ्यू सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज दुपारी १२.३० ते २.३० वाजेपर्यंत संचारबंदी उठवली आहे.  तर  आजूबाजूच्या शहरांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. हरियाणातील पलवल, सोहाना, मानेसर आणि पतौडीमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या हिंसाचाराच्या विरोधात विश्व हिंदू परिषदेने आज (दि.२) देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. हरियाणातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील ११ जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणी दीड हजारांहून अधिक जणांविरुद्ध ३० एफआयआर नोंदविण्यात आले आहेत.

Haryana Nuh Violence : विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते खुर्जामध्ये धरणे धरत बसले आहेत

नूह दंगलीनंतर बुधवारी सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी खुर्जा येथील जेवर तळावर धरणे धरले आहे. त्याचवेळी आंदोलनाची माहिती मिळताच एसपी देहत बजरंगबली चौरसिया यांच्यासह चार पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हिंदू संघटनांनी संघटित होऊन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच पीडितांच्या कुटुंबीयांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. संघटनेच्या आंदोलनामुळे खुर्जाचा गांधी रोड, जंक्शन रोड आणि कचरी रोडवरील वाहतूक ठप्प झाली आहे.

हरियाणा, नूहमध्ये कालपासून कोणतीही हिंसक घटना घडलेली नाही. आतापर्यंत 41 एफआयआर नोंदवण्यात आले असून 116 जणांना अटक करण्यात आली आहे. त्या लोकांना आज न्यायालयात हजर करून चौकशी केली जाईल. तपासाच्या आधारे योग्य ती कारवाई करू,

– पीके अग्रवाल,  डीजीपी हरियाणा

हेही वाचा 

Back to top button