वाशिम: संभाजी भिडे यांच्याविरोधात निदर्शने; कार्यकर्त्यांना अटक | पुढारी

वाशिम: संभाजी भिडे यांच्याविरोधात निदर्शने; कार्यकर्त्यांना अटक

वाशिम: पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. वाशिम येथे आज (दि.३०) त्यांची होणारी सभा उधळवून लावण्यासाठी आज सकाळी दहा वाजता शहरातील सामाजिक व राजकीय संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

यावेळी कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून भिडे गुरूजी यांच्याविरोधात तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. यावेळी निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

शहरात आज (दि.३०) होणारा भिडे गुरूजी यांचा कार्यक्रम रद्द करावा, या मागणीसाठी शहरातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. भिडे यांच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात भिडे यांची सभा होण्याचे नियोजन केले होते. यामुळे संतापलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी अकोला नाका येथे एकत्र येऊन आंदोलन सुरू केले.

या आंदोलनाचे नेतृत्व संभाजी ब्रिगेडचे गजानन भोयर, समनक जनता पार्टीचे डॉ. रामकृष्ण कालापाड, गजानन धामणे, भारतीय बौद्ध महासभेचे सिद्धार्थ गायकवाड, अखिल भारतीय माळी महासंघाचे गजानन ठेंगडे, भीम टायगर सेनेचे सुमित कांबळे, भारत मुक्ती मोर्चाचे सिताराम वाशिमकर, जय भीम तरुण उत्साही मंडळाचे रवी पट्टेबहादूर, काँग्रेसचे शंकर वानखेडे, शिवसेनेचे नितीन मडके, शेतकरी संघटनेचे गणेश अढाव, ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेनेचे जगदीश मानवतकर, वंचित बहुजन आघाडीचे सोनाजी इंगळे यांनी केले.

हेही वाचा 

Back to top button