हिंगोली: औंढा नागनाथमध्ये लोखंडी गेट अंगावर पडल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिराच्या पुर्व प्रवेशद्वाराचे गेट अंगावर पडल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.२५) सकाळी घडली आहे. सोमनाथ अरुण पवार (रा. औेढा नागनाथ) असे मृत मुलाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
औंढा नागनाथ मंदिराचा पुर्वेकडील दरवाजा बंद आहे. त्या ठिकाणी लोखंडी गेट लावण्यात आले असून भाविक व लहान मुले तलावाकडे जाऊ नये यासाठी संरक्षण भिंत देखील उभारण्यात आली आहे.
मात्र, या गेट जवळच बाहेरच्या बाजूला लहान मुले खेळतात. सकाळी सोमनाथ हा लोखंडी गेटवर चढून आत येण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र तो गेटवर चढल्यानंतर अचानक गेट तुटले अन तो मंदिरातील फरशीवर पडला आणि त्याच्या अंगावर गेट पडले.
सुमारे १ ते दिड क्विंटल वजनाचे लोखंडी गेट अंगावर पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली अन त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तेथील नागरीकांनी तातडीने घडलेल्या घटनेची माहिती औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिली.
पोलीस निरीक्षक गणपत राहिरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अफसर पठाण यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सोमनाथ यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
हेही वाचा;