बीड, नेकनूर, ईट येथील जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेटच्या शाखेतून कोटींच्या घरात अपहार झाल्याचे या तिन्ही ठिकाणी झालेल्या गुन्ह्याच्या नोंदीतून पुढे आले आहे. हा आकडा अजून वाढू शकतो. आर्थिक गुन्हे शाखेकडे असणारा तपास एसआयटी नेमून केजचे उपअधीक्षक आयपीएस पंकज कुमावत यांच्याकडे सोपवण्यासाठी ठेवीदारांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. ही मागणी मान्य झाल्याने ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. घरांसाठी आणि विवाहासाठी अनेकांनी पै-पे जमा करून ठेवलेली पुंजी अडकल्याने ठेवीदार हवालदिल झाले आहेत.
कष्टकरी, मजूर, शेतकरी, पेन्शनर, व्यापारी यांच्या विश्वासाला बीड येथे वीस वर्षे तर नेकनूर, ईट येथील जिजाऊ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखा पंधरा वर्षे झाल्याने विश्वास पात्र ठरल्या होत्या. विशेष म्हणजे याच परिसरातून पुढे आलेले संस्थेचे मार्गदर्शक बबनराव शिंदे आणि अध्यशा अनिता बबनराव शिंदे असल्याने खातेदारांची संख्या झपाट्याने वाढली. राष्ट्रीयकृत बँकेत असणारी गर्दी पाहून शेतकऱ्यांनी कांद्याचे, सोयाबीनचे चेक याच शाखेला दिले. फिक्स रकमेला व्याजदर चांगला असल्याने अनेकांनी भविष्याची गुंतवणूक या ठिकाणी ठेवली होती. यामध्ये मजुरापासून ते नोकरदार वर्गांचा मोठा समावेश आहे.
मागच्या तीन महिन्यात अचानक मल्टीस्टेटला टाळे लागले . मार्गदर्शक आणि अध्यक्ष यांनी शाखा असणाऱ्या ठिकाणी बैठका घेऊन लवकरच रक्कम व्याजासह परत देण्याचे आश्वासन वारंवार दिल्याने ठेवीदार पैसे मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र, तारीख पे तारीख एवढेच होऊ लागल्याने अखेर ठेवीदार तक्रारीसाठी पुढे आले. बीड पाठोपाठ नेकनूर, ईट या ठिकाणी मोठी फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास देण्यात आला होता. मात्र, ठेवीदार हा तपास एसआयटी नेमून करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यामध्ये वृद्धासह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रमुख मागणी असलेल्या तपासाची सूत्रे पंकज कुमावत यांच्याकडे दिल्याने ठेवीदारांना पैसे परत येण्याचा विश्वास वाढला आहे. गुरुवारी सायंकाळी नेकनूर शाखेच्या ठिकाणी जाऊन एपीआय विलास हजारे, पोलीस कॉन्स्टेबल गोविंद राख यांनी पंचनामा केला. त्यामुळे तपासाला वेग आला आहे.
नेकनूर ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार असलेली वृद्ध महिला दिवसभरात इतरत्र सफाईचे काम करत नेकनूरच्या जिजाऊ माँसाहेब शाखेतही सफाईचे काम करत होती. तिने कामाच्या मोबदल्यातून मिळणाऱ्या रकमेचे घर बांधण्यासाठी डिपॉझिट केले होते. हे डिपॉझिट सहा लाखाच्या पुढे गेले. परंतु बँक बंद पडल्याने पैसे अडकले.
नेकनूर येथील जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट सोसायटीतील फसवणुकीचा तपास आता एसआयटीकडे सोपवला आहे. पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास होणार असल्याने ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तर नेकनूर पोलीस ठाण्याचे एपीआय विलास हजारे यांनाही एसआयटीच्या तपास यंत्रणेत घेण्याची मागणी ठेवीदारांनी केली आहे.
हेही वाचा