बीड : नेकनूर ग्रामपंचायतचा अजब कारभार! एसी, खुर्च्या खरेदीसाठी लाखोंची उधळपट्टी | पुढारी

बीड : नेकनूर ग्रामपंचायतचा अजब कारभार! एसी, खुर्च्या खरेदीसाठी लाखोंची उधळपट्टी

नेकनूर (मनोज गव्हाणे) : गावात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आवासून उभी आहे, कचऱ्याचे ढिगारे कित्येक महिने उचलले जात नाहीत, पथ दिवे बंद आहेत, अशा कित्येक समस्या गावात असताना यावर खर्च न करता नेकनूर ग्रामपंचायतची मात्र वेगळ्याच कामांवर उधळपट्टी सुरू आहे. प्रशासकाने ग्रामपंचायत एसीमय केली, नव्या खुर्च्या घेतल्या. गावात रस्ते, नाले, पाणी, वीज याची गरज असताना ग्रामपंचायत प्रशासकाने मात्र जवळपास साठ लाखापर्यंतचा निधी नको तिथे खर्च केला आहे. भंडारवाडी पाणी पुरवठा दुरुस्तीवर लाखोंचा खर्च करूनही अद्याप नेकनूरात पाणी आलेले नाही. या सगळ्यात ग्रामसेवक, प्रशासकाने मात्र लाखो रूपयांचा निधी खर्च करताना हात धुवून घेतल्याची चर्चा गावात सुरू आहे.

जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये नेकनूरचा सहभाग असल्याने शासनाकडून कोट्यावधीच्या घरात निधी येतो. जानेवारीपासून नेकनूर ग्रामपंचायतीवर मुदत संपल्याने प्रशासक आहे. पंधरावा वित्त आयोगातून आलेला निधी आवश्यक कामावर खर्च करने अपेक्षित असताना ग्रामसेवक आणि प्रशासकांनी हा निधी चक्क ग्रामपंचायतला एसी, खुर्च्यांची खरेदी करण्यात खर्च केला आहे. विशेष म्हणजे लोकांना पण खुश ठेवण्यासाठी गावात काही ठिकाणी सिमेंट बाकडी बसवलीत. त्याच्या खरेदी रक्कम लाखो रूपये असल्याने हा खर्च फक्त पावत्या जोडण्यासाठी केल्याचे दिसून येत आहे. सध्या उन्हामुळे अनेक भागातील बोअरवेल बंद पडले आहेत. नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यातच याआधी कोट्यवधी रूपये खर्च केलेल्या भंडारवाडी योजनेचे पाणी आणण्यासाठी गेल्या काही महिन्यात लाखोंचा खर्च दाखवला गेला. मात्र प्रत्यक्षात अद्यापही नेकनूरमध्ये पाणी आलेले नाही. अनेक भागात तर नळच नाहीत. ज्या भागात नळ आहेत त्यांना आठ दिवसाला पाणी मिळणे मुश्किल आहे. शिक्षक कॉलनी, दवाखाना परिसर, नन्नवरे वस्ती, काळे वस्ती अशा कितीतरी भागांना अद्याप मूलभूत सुविधाच नाहीत. रस्ते, नाले, पाणी, वीज याची गरज असताना ग्रामपंचायत प्रशासकाने मात्र जवळपास साठ लाखापर्यंतचा निधी नको तिथे खर्च करून हम भी कुछ कम नही याप्रकारेच नेकनुरच्या पुढार्‍यांचा आदर्श घेतला आहे. बेभावाने केलेल्या खरेदीची चौकशीची मागणी आता नागरिकातून होत आहे.

वित्त आयोगाचा प्रत्येक वर्षी कोट्यावधींचा निधी नेकनूरला मिळतो. शिवाय बाजार, गाळे यांचे भाडे वेगळेच मिळते. असे असतानाही नेकनूरचा विकास होत नसल्याची खंत कायम आहे. मोठ्या आठवडी बाजारात तर अस्वच्छता, पाण्यापासून सर्वच गोष्टीचे हाल आहेत, असे असतानाही निधी खर्च केल्याचे दाखवले जाते.

या प्रकरणामुळे यापूर्वीचे ग्रामसेवक कैलवाड एलईडी घोटाळ्यात अडकून निलंबित झाले. ग्रामपंचायतच्या पाठीमागे सध्या चौकशीचा ससेमेरा लागला आहे. असे असतानाही सध्याच्या प्रशासक, ग्रामसेवकांनी काम दाखवण्याच्या नादात मूलभूत सुविधांना बगल देत अनावश्यक खर्च केला तोही कितीतरी लाखांचा आहे. सध्या सोशल मीडियावर ग्रामपंचायतच्या खर्चाचे दाखले जोरात फिरत आहेत. याबाबत प्रशासक पांडुरंग तांदळे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता “मी बीडला असून नेकनूर येथे आल्यानंतर दोन दिवसात माहिती देतो” असे सांगितले. तर याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी ग्रामसेवक बहिरवाळ यांना भ्रमणध्वनी केला असता त्यांनी उत्तर दिले नाही.

हेही वाचा : 

Back to top button