

नांदेड,पुढारी वृत्तसेवा : आई फार मोबाईल वापरू देत नाही म्हणून एका अल्पवयीन मुलीने मध्यरात्री घर सोडले, मात्र पोलिसांच्या सतर्कतेने ही मुलगी सुखरुप आपल्या घरी पोहोचली आहे. आरती (बदललेले नांव) या 14 वर्षाच्या मुलीला तिची आई मोबाईल वापरु देत नाही म्हणून ती रागाच्या भरात मंगळवारी मध्यरात्री घरातून बाहेर पडली. कुठे जायचे निश्चित नसल्याने ती हिंगोली गेट येथे रस्त्यावरच फिरु लागली. त्याचवेळी दाामिनी पथकातील पोलिस कर्मचारी गणपत बुरफूले यांच्या नजरेस पडली. बुरफूले यांना संशय आल्याने त्यांनी आरतीला वजिराबाद ठाण्यात नेले.
पोलीस कर्मचारी आशा नारळे आणि मिनाक्षी हसरगोंडे यांनी आरतीशी संवाद साधण्यास सुरुवात केली. सुरुवातीला आरतीने आपले नाव आणि इतर माहिती चुकीची सांगितली, त्यामुळे पोलिसांचा संशय खरा ठरु लागला. त्यानंतर त्यांनी आरतीला विश्वासात घेऊन विचारल्याने तिने तिचे नाव, आई-वडिलाचे नाव आणि इतर माहिती खरी सांगितल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले. एव्हाना पहाटेचे दोन वाजले होते. आरतीने ती नववी वर्गात शिकत असल्याचे सांगितल्यानंतर आगलावे यांनी शाळेच्या मुख्यध्यापकाशी संपर्क साधला आणि आरतीचा फोटो त्यांना पाठविला. मुख्याध्यापकांनी आरतीला ताबडतोब ओळखले आणि त्यांनी तिच्या पालकांशी संपर्क करुन ते सर्वजण पोलिस ठाण्यात हजर झाले. सर्वजण ठाण्यात आल्यानंतर आरतीने घरी जाण्यास नकार दिला.
समुपदेशक प्रवीण आगलावे यांनी आरतीची मानसिकता ओळखून त्यांनी आरतीला तू माझ्यासोबत माझी मुलगी म्हणून माझ्या घरी रहा असे सांगत थेट आपली पत्नी रवीना यांना फोन करून ठाण्यात बोलावून घेतले. परिस्थिती समजल्यानंतर रवीना यांनीही आरतीला मुलगी म्हणून स्वीकारण्यास संमती दिली. आता हे लोक आपल्याला घेऊन जातील या भीतीने आरती आई-वडिलांसोबत जाण्यास तयार झाली.