Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावरील भीषण बस अपघातानंतर अजित पवारांनी शासनाला सुनावले, आता तरी… | पुढारी

Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावरील भीषण बस अपघातानंतर अजित पवारांनी शासनाला सुनावले, आता तरी...

पुढारी ऑनलाईन डेस्क : समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ पिंपळखुटा येथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायडरला धडकून उलटली. यानंतर ट्रॅव्हल्स बसने पेट घेतल्यामुळे २६ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे तर सातजण सुखरुप आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत “समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यावर तातडीनं उपाययोजना करण्याच्या मागणीचा गांभीर्यानं विचार करावा, अशी मागणी केली आहे. (Buldhana Bus Accident)

Buldhana Bus Accident : शासनानं  गांभीर्यानं विचार करावा

राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करून घटनेबाबत शोक व्यक्त करत अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचबरोबर त्यांनी “समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणीही केली आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटल आहे,”नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृद्धी महामार्गावर बुलढाणा – सिंदखेडराजा येथे अपघात होऊन २५ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृद्धी महामार्गावर बसचा टायर फुटल्यानं बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसनं पेट घेतला. या भीषण दुर्घटनेनंतर समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षानं ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनानं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. आजच्या भीषण बस दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेतील जखमी प्रवाशांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो.”

“समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या वतीनं सातत्यानं करण्यात आली आहे. शासनानं आतातरी या मागणीचा गांभीर्यानं विचार करावा, अशी मागणी करतो.”

हेही वाचा 

Back to top button