पारनेर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : पारनेरचे नगराध्यक्ष विजय औटी यांनी राजीनामा दिल्यानंतर सुरू झालेल्या नगराध्यक्ष निवड कार्यक्रमात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी 'विशेष लक्ष' घालून आमदार लंके यांना धोबीपछाड देण्याची तयारी चालविली आहे. भाजपकडे केवळ एक जागा असताना शिवसेना आणि अपक्षांची मोट बांधत राष्ट्रवादीच्या दोघांना फोडून नगराध्यक्ष पदाला गवसणी घालण्याचा डाव खासदार विखे यांनी टाकला आहे.
रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी शुक्रवारी (दि. 30) अर्ज स्वीकारण्यात आले, त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार नीलेश लंके यांच्या सूचनेवरून अपक्ष सहयोगी नगरसेवक नितीन अडसूळ यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात खासदार डॉ. विखे यांच्या गटाकडून शिवसेनेचे नगरसेवक युवराज पठारे यांनी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी, भाजपच्या नगरसेवकांची शिवसेनेच्या नगरसेवकांना साथ मिळाल्याने चर्चेला उधाण आले आहे. आज (दि. 1) अर्जांची माघार व 5 जून रोजी नगराध्यक्ष निवड होणार आहे.
पारनेर नगराध्यक्षपदाच्या राजीनामा नाट्यानंतर नवीन अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता लागली होती. नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे 7 व शिवसेनेचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत. शहर विकास आघाडीचे 2, अपक्ष 2 व भाजप 1 असे पक्षीय बलाबल होते. आमदार नीलेश लंके यांनी तालुका आघाडीच्या 2 नगरसेवकांना सोबत घेत अपक्ष नगरसेवकांना राष्ट्रवादीच्या गळाला लावले आणि विजय औटी यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ घातली होती. सव्वा वर्षानंतर नगराध्यक्ष बदलण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे विजय औटी यांनी राजीनामा दिला. दरम्यानच्या काळात भाजपशी विजय औटी यांची जवळीक वाढल्याचे बोलले जात होते. युवराज पठारे यांचा उमेदवारी अर्ज भरताना औटी यांची उपस्थिती त्याचेच फलित असल्याचे मानले जात आहे.
भाजपचे नगरसेवक अशोक चेडे यांनीही याआधी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या गटनोंदणीला साथ देत सहयोगी सदस्य असल्याचे लिहून दिले होते; मात्र त्यांनीही पठारे यांच्यासमवेत उपस्थिती लावली. खरे तर नगराध्यक्षपदाचा शब्द त्यांनाच दिल्याचे बोलले जाते. म्हणूनच राष्ट्रवादीकडून अडसूळ यांनी अर्ज भरल्यानंतर चेडे यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत पठारे यांना पाठिंबा दर्शवल्याचे दिसते.
दरम्यान, राष्ट्रवादीसह खासदार विखे गटातील नगरसेवक सहलीला रवाना झाल्याची चर्चा आहे.
दोन्हीकडे 9-9 नगरसेवक?
पारनेर नगरपंचायतीत आमदार नीलेश लंके गटाचे वर्चस्व आहे. लंके समर्थक माजी नगराध्यक्ष विजय औटी, नगरसेवक अशोक चेडे यांनी लंके यांना सोडचिट्टी देऊन थेट विखे समर्थक पठारे यांना पाठिंबा दर्शवला. हा खासदार विखे पाटील यांनी टाकलेला डाव असल्याचेच येथे बोलले जात आहे. त्यामुळे नगराध्यक्ष निवडणुकीत रंगत आली आहे. नगरपंचायतीत 18 नगरसेवक असून बहुमतासाठी 10चा आकडा महत्त्वाचा आहे. परंतु दोन्ही गटांकडे प्रत्येकी नऊ नगरसेवकांची संख्या असल्याचे बोलले जात आहे. दि. 5 जून रोजी होणार्या नगराध्यक्ष निवडीत कोण बाजी मारतो, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा :