

गोरेगाव; पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील प्राथमिक उपकेंद्राची इमारतीला ४० वर्षे पूर्ण झाली असून या जुन्या इमारतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणी नवीन इमारत बांधावी, अशी मागणी गावकऱ्यांनी कडोळी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रऋषी नानाजी देशमुख यांची जन्मभूमी असलेल्या व प. पु. रमतेराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या कडोळी येथील आरोग्य उपकेंद्राअंतर्गत पाच गावांचा समावेश आहे. याठिकाणी शासनाने लाखो रुपये खर्चून चाळीस वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्थापन केले. सध्या ही इमारत मोडकळीस आली आहे. पावसाळ्यामध्ये इमारत चोहोबाजूंनी गळायला लागते यामुळे येणाऱ्या रुग्णाला जीव मुठीत घेऊन उपचार घ्यावे लागतात. इमारतीसमोर घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे वरिष्ठांनी तात्काळ दखल घेऊन येत्या पंधरा दिवसांत आरोग्य उपकेंद्रासाठी भाडेतत्त्वावर इमारत घेऊन आरोग्य सुविधा सुरळीत सुरू करावी, अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने संतोष माहोरकर यांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायत कार्यालय कडोळी यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा :