Banana Export: दांडेगावच्या केळीला दुबईकरांची पसंती

Banana Export: दांडेगावच्या केळीला दुबईकरांची पसंती

सध्या स्थानिक बाजारपेठेत केळीला 700 ते 800 रूपये प्रतिक्‍विंटल दर मिळत असल्याने केळी उत्पादक हवालदिल झाले आहेत. धरती शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या पुढाकारातून दांडेगाव येथील दर्जेदार केळीची थेट दुबईला निर्यात (Banana Export) होत आहे. दुबईकरांना दांडेगावची दर्जेदार केळी पसंतीला उतरल्याने दुबईत केळीला 1200 ते 1400 रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक फायदा होऊ लागला आहे.

कळमनुरी तालुक्यात डोंगरकडा व दांडेगाव परिसरातील सालापूर, गिरगाव, मालेगाव, डिग्रस बु., कुरूंदा, जवळा पांचाळ, वारंगा फाटा आदी भागात मोठ्या प्रमाणात केळीची (Banana Export) लागवड करण्यात येते. इसापूर धरणाचे मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने केळीची लागवड दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु मागील तीन महिन्यांपासून स्थानिक बाजारपेठेत केळीला 700 ते 800 रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळत असल्याने केळी उतपादक शेतकरी अडचणीत सापडले होते.

ही बाब लक्षात घेऊन धरती शेतकरी प्रोड्युसर कंपनीचे सागर कोपर्डीकर, पाबळे, डोंगरकडा येथील श्रीधर गावंडे, बाळासाहेब गावंडे यांनी गावोगावी जावून केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या भेटी घेत उत्तम दर्जाच्या केळी निर्यात करण्यासाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे दर्जेदार केळीचे उत्पादन कसे काढायचे, त्यासाठी खत, किटकनाशक व इतर नियोजन कसे करायचे यासदंर्भात मार्गदर्शन सुरू केले.

Banana Export : जागेवरच केळीची पॅकिंग करून तो माल थेट निर्यात

सध्या दांडेगाव येथील केळी उत्पादक शेतकरी दिलीप इंगोले यांची केळीची बाग काढणीसाठी तयार झाल्याने धरती शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून त्यांच्या दर्जेदार केळीची पहिली खेप रविवारी दुबईकडे रवाना झाली. दिलीप इंगोले यांनी आपल्या शेतात 5 हजार केळीची लागवड केली आहे. केळीचा दर्जा उत्तम असल्याने ती केळी निर्यात केली जात आहे. विशेष म्हणजे एक्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना कोणतीही आडत, हमाली, वाहतुक खर्च लागत नसल्याने उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जागेवरच केळीची पॅकिंग करून तो माल थेट निर्यात होत असल्याने शेतकर्‍यांच्या हातावर अधिकचे चार पैसे पडत आहेत.

माझ्याकडे पाच हजार केळीची झाडे आहेत. सध्या केळीची काढणी सुरू असून धरती शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या मार्गदर्शनाखाली माझ्या केळी थेट दुबईला निर्यात होत आहेत. दरही स्थानिक बाजारपेठेपेक्षा अधिक मिळतो आहे. शेतकर्‍यांनी दर्जेदार केळीचे उत्पादन केल्यास हमखास मालाची निर्यात होऊन अधिकचा नफा मिळेल.

– दिलीप इंगोले, केळी उत्पादक शेतकरी

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news