जालना : भोकरदन येथे सोयाबीनचा बोगस बियाणांचा साठा जप्त; कृषी विभागाची कारवाई       | पुढारी

जालना : भोकरदन येथे सोयाबीनचा बोगस बियाणांचा साठा जप्त; कृषी विभागाची कारवाई      

भोकरदन : पुढारी वृत्‍तसेवा खरिपाची पेरणी तोंडावर असताना बोगस बियाणांचा सुळसुळाट वाढला आहे. भोकरदन कृषी विभागाने बोगस बियाणांचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत २५० क्विंटल सोयाबीन बियाणांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईने शेतकरी वर्गात मात्र चिंता वाढली आहे.

दरम्यान सोयाबीनच्या बोगस बियाणांच्या ३३२ बॅगांचा साठा जप्त करुन त्यावर विक्री बंदी आदेश बियाणे निरिक्षक आर. एल. तांगडे यांनी दिले आहे. भोकरदन-जालना रस्त्यावरील बरांजळा पाटीजवळ असलेल्या केळणा पूर्णा प्रोड्युसर कंपनीच्या बाजुला एका पत्र्याच्या शेडमध्ये सोयाबीनच्या बोगस बियाण्यांची पँकींग सुरु असल्याची गुप्त माहिती भोकरदन कृषी विभागाला मिळाली त्‍या नंतर शुक्रवारी (दि.०९) दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान कृषी विभागामार्फत त्या स्थळी जाऊन ही धडक कारवाही करण्यात आली. यामध्ये पंचविस किलो पॅकिंग वजन असलेल्या तब्बल ३३२ विना लॉट नंबर, विना पॅकिंग तसेच विना एक्सपायरी डेट नसलेल्या बॅगांचा मोठा साठा आढळुन आला आहे.

यावेळी सदर गोडाउन चालविणारे विजय गंगाराम म्हस्के रा. बरांजळा लोखंडे व पॅकिंगचे काम पाहाणारे सुनिल भाऊसाहेब कऱ्हाळे यांना सुरु असलेल्या पॅकिंग बाबत अधिकाऱ्यांनी विचारणा केली. त्‍यावेळी त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. म्हणुन सदर पॅकिंग होत असलेल्या बोगस बियाणांचा साठा जप्त करण्यात आला असुन, त्यावर विक्री बंदी आदेश देण्यात आले आहेत. या गोडाउन मध्ये लोकप्रिय सिड्स प्रा.ली. तेलंगणा या कंपनीचे के.डी. एस. ७३६ ( फुले संगम ) सोयाबिनचे बियाणे पॅकींग सुरु असतांना आढळुन आले.

यात पंचविस किलो वजनाच्या पॅकिंगच्या २१३ बॅगा आढळुन आल्या तर बायडेन अँग्रोव्हेट प्रा.लि. हनुमान नगर गारखेडा परिसर संभाजी नगर या नावाने पॅकेट डबल सेवन उत्पादित केलेल्या सोयाबीनच्या एकुण ११९ बॅगा आढळुन आल्या आहेत. विशेष म्हणजे यात लॉट नंबर उत्पादित तारिख नमुद नसल्यामुळे हा साठा बोगस असल्याचे दिसून आले आहे. यात जवळपास नामांकित कंपन्याच्या बॅगांमध्ये ८३ क्विंटल बियाणे भरण्यात आल्याचे आढळून आले. तर पोत्यामध्ये १८३ क्विंटल सोयाबीन बाकी होते. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विकास अधिकारी एस. व्ही. कराड, कृषी अधिकारी आर. एल. तांगडे, तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते, काकडे, मंडळ कृषी अधिकारी भिसे, कृषी सहायक सुनील रोकडे, प्रभाकर पाबळे, अंकुश भोंबे, प्रवीण भोपळे यांनी केली.

हेही वाचा : 

Back to top button