Medical Instruments : मेडिकल कॉलेजच्या यंत्रसामुग्रीसाठी सव्वादोन कोटींचा निधी मंजूर

परभणी, पुढारी वृत्तसेवा : Medical Instruments : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणार्या यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदीसाठी राज्य शासनने 2023-24 या वर्षासाठी राज्य योजनेंतर्गत मंजूर अनुदानातून 2 कोटी 27 लाख 70 हजार 322 रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मंगळवारी (दि.6) याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षासाठी मेडिकल कॉलेजच्या विविध विभागांसाठी यंत्रसामुग्री उपलब्ध होणार आहे.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Medical Instruments) मंजुरी संदर्भात नॅशनल मेडिकल काउन्सीलने मोठ्या प्रमाणावर त्रुटी काढून मान्यता रद्दचे आदेश काढले होते. या आदेशाविरोधात दाखल केलेले पहिले अपीलही फेटाळले गेले असून त्यानंतर महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे यांनी दुसरे अपील बुधवारी (दि.7) दाखल केले आहे. ही सर्व प्रक्रिया सुरू असतानाच यापूर्वी मेडिकल कॉलेजसाठी लागणार्या विविध यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदी करण्याबाबत अधिष्ठाता डॉ.सुक्रे यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्तांकडे निधीची मागणी केली होती. त्या आधारे राज्य शासनाने आगामी शैक्षणिक वर्षासाठी 2 कोटी 27 लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.
राज्य योजनेतंर्गत मंजूर अनुदानातून हा निधी देण्यात आला असून त्यातून मेडिकल कॉलेजच्या अॅनाटॉमी, बायोकेमीस्ट्री, पीझॉलॉजी या तीन विभागांसाठी लागणार्या विविध यंत्र, साधने व अन्य साहित्याची खरेदी केली जाणार आहे. प्रत्येक विभागात लागणार्या त्या-त्या साहित्याची संख्या, प्रत्येक नगाची किंमत व त्यासाठी लागणारा निधी याचीही तरतूद करण्यात आली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता राज्य योजनेंतर्गत हा निधी मिळत असून कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीच्या नियम पुस्तिकेचे पालन करण्यात यावे. (Medical Instruments)
यंत्रसामुग्री खरेदी विषयक प्रक्रिया शासन निर्णयानूसार गर्व्हर्नरमेंट ईमार्केट प्लेस (जीईएम) पोर्टलवरून ज्यांचे दर कमी असतील त्या प्रमाणे कार्यपद्धती राबवून करण्यात यावी. त्याची किंमत बाजारभावापेक्षा जास्त नसल्याची खात्री आयुक्त व अधिष्ठाता यांनी करावी, असेही म्हटले आहे. यंत्रसामुग्रीसाठी कोणत्याही नवीन बांधकामाची, विद्युतीकरणाची, नवीन पदनिर्मितीची आवश्यकता नसल्याची खात्री करण्यात यावी, किमान तीन उत्पादकांकडून निविदा प्राप्त करून घेण्यात याव्यात, असेही कार्यासन अधिकारी सुधीर जया शेट्टी यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. (Medical Instruments)
हे ही वाचा :
परभणी : शेवटच्या टप्प्यात लक्ष्मीअस्त्र प्रभावी; मानवत बाजार समितीचा प्रचार शिगेला
परभणी: थॅलेसेमियावर मात करत बारावीच्या परीक्षेत दोघांची बाजी