परभणी : शेवटच्या टप्प्यात लक्ष्मीअस्त्र प्रभावी; मानवत बाजार समितीचा प्रचार शिगेला | पुढारी

परभणी : शेवटच्या टप्प्यात लक्ष्मीअस्त्र प्रभावी; मानवत बाजार समितीचा प्रचार शिगेला

परभणी (मानवत); पुढारी वृत्तसेवा : मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करून मतदान आपल्याकडे वळविण्याचे सर्व पर्याय संपल्यानंतर शेवटच्या टप्प्यात तीनही पॅनलकडून लक्ष्मी अस्त्राचा वापर सुरू झाला आहे. यामुळे मतदारराजाला चांगलाच भाव आला आहे. तसेच ही निवडणूक तालुक्यासह जिल्हास्तरीय नेत्यांनी प्रतिष्ठेची केली असून आपलचं पॅनल कस निवडून येईल अशी व्युहरचना तयार केली आहे.

बाजार समितीची निवडणूक शनिवारी (दि. १०) होत आहे. निवडणूकीच्या रिंगणात एकूण १८ जागेसाठी तीन पॅनल व अपक्ष उमेदवार मिळून ५९ उमेदवार उभे आहेत. या निवडणुकीत माजी सभापती पंकज आंबेगावकर यांनी शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून संपूर्ण १८ जागी उमेदवार दिले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष पंडितराव चोखट बळीराजा विकास पॅनलमध्ये महाविकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांना संधी देऊन लढत चुरशीची बनवली आहे. पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तराव जाधव, चंद्रकांत सुरवसे व कारभारी आवचार यांनी एकत्र येत एकूण १५ जागेवर उमेदवार उभे करीत श्री इंद्रायणी देवी शेतकरी बचाव पॅनल मैदानात उतरविले आहे.

या निवडणुकीत तालुक्यात फक्त १५०८ मतदार असून प्रचाराच्या गेल्या ८ दिवसात तीनही पॅनलच्या वतीने या मतदारांचा थेट संपर्क साधण्यात येऊन मतदानासाठी साद घालीत विविध प्रलोभने दिल्याची चर्चा आहे. यासाठी तीनही पॅनलच्या वतीने दिलेल्या शेतातीत पार्ट्याही चांगल्याच रंगल्या होत्या. मेळावे ही घेण्यात आले. तीन पॅनेलच्या घाईगर्दीत काही अपक्ष उमेदवारांनी देखील प्रचाराचा धुमधडाका केला आहे.

मोठे नेतेही झाले सक्रिय

बाजार समितीच्या निवडणुकीत सुरवातीला पडद्याआड असलेले जिल्ह्यातील नेतेमंडळीही शेवटच्या टप्प्यात चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. चोखट यांच्या पॅनेलसाठी खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपूडकर, आमदार बाबाजानी दुराणी यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. पंकज आंबेगावकर गटासाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार मेघना साकोरे, माजी आमदार मोहन फड व माणिकराव आंबेगावकर, राजेश विटेकर यांनी शक्ती पणाला लावली आहे.

तसेच इंद्रायणी देवी पॅनल सध्या तरी स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाताना दिसत असली तरी जिल्ह्यातील काही नेत्यांचे त्यांचे नेहमीचे सख्य पाहता वेळेवर पडद्याआड खेळी खेळली गेल्यास निवडणूक निकालावर त्याचा परिणाम दिसून येणार असल्याची चर्चा आहे.

लक्ष्मीअस्त्र प्रभावी ठरणार

बाजार समितीच्या या निवडणुकीत सबसे बडा रूपेय्या या उक्तीप्रमाणे शेवटच्या टप्प्यात सर्वच पॅनल कडून लक्ष्मीअस्त्राचा प्रभावी वापर सुरू झाल्याची चर्चा आहे. यामुळे निवडणुकीत क्रॉस वोटिंग जास्त प्रमाणात होणार असून निवडणूक निकाल हाती येईपर्यंत तरी नेत्यांची धाकधूक मात्र वाढणार हे मात्र निश्चित आहे.

हेही वाचा;

Back to top button