Sharad Pawar : राज्यांच्या निवडणुकांचा ट्रेंड भाजप विरोधी – शरद पवार | पुढारी

Sharad Pawar : राज्यांच्या निवडणुकांचा ट्रेंड भाजप विरोधी - शरद पवार

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभेचा निकाल लागल्यानंतर सत्ताधारी विधानसभेच्या भानगडीत पडतील, असे वाटत नाही. ते लोकसभेची तयारी करतील, राज्यातील सरकारही लोकसभेवर लक्ष केंद्रित करतील, असे सांगत देशातील विविध राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप विरोधी ट्रेंड असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (Sharad Pawar)

यावेळी पवार म्हणाले की, देशाचा नकाशा समोर ठेवला तर केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, हिमाचल, दिल्ली, पंजाब पश्चिम बंगालमध्ये भाजप नाही, गोवा आणि मध्य प्रदेशमध्ये आमदार फोडून सरकार स्थापन करण्यात आले, आता राज्याच्या निवडणुकांमध्ये लोकांनी बदल करण्याची भूमिका घेतलेली आहे, हाच ट्रेंड जर लोकसभेला राहिला तर वेगळे चित्र बघायला मिळेल हे सांगायला ज्योतिषाची गरज पडणार नाही, देशाचा सामान्य माणूस शहाना आहे, महाविकास आघाडी आणि आगामी निवडणुका याबद्दल शरद पवार म्हटले की, महाविकास आघाडी सक्षम आहे, तीनही पक्षाने एकत्र घेण्याची भूमिका घेतली आहे, बैठकींमध्ये तीनही पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य सहभागी होऊन जागा वाटपाची चर्चा सुरू करावी असा विचार आहे, ही प्रक्रिया सुरू होईल, चार जागा लढावायच्या असतात, मात्र दहा जागांची मागणी करतात शेवटी वाटाघाटीतून जागा कमी होतात, पण ज्यांची निवडून आणण्याची क्षमता आहे त्यांना प्राधान्य द्यावे ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचे पवार यांनी सांगितले. (Sharad Pawar)

विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावाला गंभीरतेने घ्यावे लागेल

जर शेतकर्‍यांची आर्थिक अडचण दूर केली, तर आत्महत्या थांबू शकतात, त्यामुळे रब्बी आणि खरीप हंगामापूर्वी शेतकर्‍यांना एकरी 10 हजार रुपये द्यावेत, अशी शिफारस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे सरकारकडे करणार आहेत, या संदर्भात त्यांनी सर्व्हेही केला आहे, असा प्रस्ताव जर विभागीय आयुक्त सारखे जबाबदार व्यक्ती सरकारकडे करणार असतील तर त्यास गंभीरतने घ्यावे लागेल, असेही पवार यांनी सांगितले.

अधिक वाचा :

Back to top button