

नेकनूर; पुढारी वृत्तसेवा : नेकनूर- मांजरसुंबा रस्त्यावरील नेकनूरजवळील मंगल कार्यालयासमोर दोन मोटरसायकल आणि कारचा आज (दि.५) दुपारी भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील बापलेकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील आणखी एकजण जखमी झाला. विनायक दादाहरी चौरे (वय ६५, रा.नारेवाडी ता. केज), विनोद विनायक चौरे वय (वय २६) अशी मृत वडील आणि मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नारेवाडी (ता. केज) येथील विनायक दादाहरी चौरे आणि विनोद विनायक चौरे मोटरसायकलवरून (एमएच २३ ए. ५८१०) वडझरी येथील आपले काम आटोपून नारेवाडीकडे जात होते. यावेळी नेकनूर येथील कालिंका मंगल कार्यालयाजवळ आले असता त्यांची मोटरसायकल आणि समोरून येणारी कार (एमएच १७ व्ही ९६९७) यांची जोराची धडक झाली. याचवेळी पाठीमागून येणारी मोटरसायकल (एमएच २० सीएन ४०७५) अपघातग्रस्त वाहनांवर येऊन धडकली.
दुचाकीवरील रामा गेणाजी गायकवाड (वय ३५, रा. सफेपूर) जखमी झाला. हा अपघात एवढा भयानक होता की बीडच्या दिशेने जाणारी कार उलट्या बाजूला जाऊन खड्ड्यात गेली. तर मोटरसायकलचे एक टायर फुटून मॅकव्हील तुटली. या घटनेनंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर कारचालक फरार झाला. घटनास्थळी नेकनूर पोलिसांनी धाव घेतली.
हेही वाचा