

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा: मी लोकांसाठी राजकारणात आहे. बहुजनांच्या, वंचितांच्या , समाजहिताच्या भूमिका घेतल्या, तर त्यात चुकीचं काय आहे. मी मुंडे साहेबांची कन्या आहे. मला भूमिका घ्यायच्या आधी सर्वांना बोलवून सांगेन, छातीठोक भूमिका घेईल. मी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. माझ्या खांद्यावर अनेक बंदूका विसावण्याचा प्रयत्न करत आहेत. मी कुणासमोरही झुकणार नाही, असे आव्हान माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपल्या विरोधकांना दिले.
भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंकजा मुंडेंनी आक्रमकपणे आपल्या भावनांना वाट करून दिली.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, सत्य, स्वाभिमान अन् वंचितांच्या सेवेचा वसा शेवटपर्यंत सोडणार नाही. सर्वच पक्षांमध्ये बदल होत असतात, माझ्या पक्षातही बदल झाले आहेत. मी मनात काही साठवून ठेवत नाही. लोकांच्या हितासाठी भूमिका घेते. भाषणातील बोलण्याचे काहीही अर्थ लावून चर्चा घडवल्या जात आहेत. याने कोणीही बिथरुन जाण्याची गरज नाही. मला भूमिका घ्यायची असेल, तर ती छातीठोक व जगजाहीर घेऊ.
माझ्या मनात अफाट त्रास असेल, माझ्या वाट्याला दुःख आले असेल, पण मी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये अनेकांचा पराभव झाला. पण तरीही त्यांना आमदारकी, मंत्रिपदे मिळाली. त्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली. संभ्रम निर्माण झाला, तो आपण तर निर्माण केलेला नाही.
याठिकाणी जे लोक आले आहेत, त्यांना मी काही दिलेले नाही. मी यावेळी कोणत्याही राजकारण्यांना निमंत्रित केलेले नाही. कोणत्याही मोठ्या नेत्यांला बोलावले नाही. मी फक्त मुंडे कुटुंबीयांवर निष्पाप प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रम ठेवला आहे. एखादी व्यक्ती जेव्हा एखादं वक्तव्य करते तेव्हा ती व्यक्ती पत्रकार परिषद घेऊन बोलते. पण जर एखादी व्यक्ती समोरच्या व्यक्तींसमोर एका भाषणात बोलत असते, त्या भाषणाचे पोस्टमार्टम करण्याला बातमी म्हणत नाहीत.
रडगाणं गाणारी मी नाही. मला या चर्चांचा कंटाळा आला आहे. तरीही संयम ठेवू. मी लोकांसाठी राजकारणात आहे. मला कोणाकडून काहीही मिळवायचे नाही. आपली कोणावरही नाराजी नाही. आपली अपेक्षा सर्व सामान्य माणसाकडून आहे. वेळ येईल तेंव्हा तुम्ही ती अपेक्षा नक्कीच पूर्ण कराल, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा