SSC Result Maharashtra 2023 : वयाच्या तिशीत दोघी बहिणी झाल्या दहावी उत्तीर्ण | Chhatrapati Sambhajinagar | पुढारी

SSC Result Maharashtra 2023 : वयाच्या तिशीत दोघी बहिणी झाल्या दहावी उत्तीर्ण | Chhatrapati Sambhajinagar

SSC Result Maharashtra 2023 - छत्रपती संभाजीनगरच्या बहिणींचे यश

भाग्यश्री जगताप, छत्रपती संभाजीनगर

: वय वाढले म्हणून काय झाले शिकण्याची आवड हवी, या उक्तीला साजेसे असे चित्र आज पाहायला मिळाले आहे. वयाच्या तिशीनंतर दोघी बहिणींनी दहावीची परीक्षा दिली अन् त्या चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाल्या. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठीच्या त्या दोघींच्या जिद्दीला सलाम. (SSC Result Chhatrapati Sambhajinagar)

यंदा दहावीची परीक्षा केवळ विद्यार्थ्यांनीच नाही, तर लहान लेकरांच्या आईनींही दिली. कोणी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तर कोणी शिकण्याची हौस म्हणून अर्धवट सुटलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी दहावीची परीक्षा देत उत्तीर्णही झाल्या.

कमी वयात लग्न झाल्याने शिक्षण सुटले. पुढे जबाबदारी म्हणून शिक्षणासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे या दोघी बहिणींना मुले मोठी झाल्यावर शिक्षण घेण्याचा निर्णय घेत दहावीची परीक्षा दिली. उषा मोरे व रत्नमाला मोरे या दोघी सख्ख्या बहिणी. उषा मोरे या दहावीला २००५ साली अनुत्तीर्ण झाल्याने घरच्यांनी त्यांचे लग्न लावून दिले. त्यामुळे पुन्हा दहावीची परीक्षा त्यांनी दिलीच नाही. तर रत्नमाला मोरे यांचे नववीला असतानाच लग्न झाल्याने पुढचे शिक्षण त्यांना घेता आले नाही.

मात्र, प्रौढ महाविद्यालयाच्या माध्यमातून दहावीला प्रवेश घेत मार्च 2023 ची परीक्षा त्या दोघींनी दिली. आणि उत्तीर्णही झाल्या. उषा यांनी 63 टक्के तर रत्नमाला यांनी 64 टक्के गुण मिळवले आहे. आता उषा व रत्नमाला या दोघींनाही पुढे उच्च शिक्षण घेऊन, नोकरी करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छा आहे.

दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने खूप आनंद झाला असून आता मला अकरावीला प्रवेश घ्यायचा आहे. उच्च शिक्षण घेऊन पुढे नोकरी करण्याची इच्छा आहे. शिक्षणाला वयाची अट नसते. त्यामुळे महिलांनी आपले शिक्षण अर्धवट सुटल्यास ते पूर्ण करावे व आपली इच्छा पूर्ण करावी.
– उषा मोरे

हेही वाचा 

Back to top button