

भोकरदन (जालना), पुढारी वृत्तसेवा : शेतीच्या बांधावरून झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात पाच जणांविरुद्ध बुधवारी भोकरदन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात यापूर्वी दाखल मारहाणीच्या गुन्ह्यात दोघे अटक असून, त्यांची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे. ही घटना १७ मे रोजी तालुक्यातील खंडाळा येथे घडली असून केशवराव सोनुने (वय ६०, रा. खंडाळा) असे मयताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा येथील केशवराव सोनुने व आप्पा सोनुने, कृष्णा सोनुने यांचा अनेक दिवसांपासून शेताच्या बांधावरून वाद होता. त्याच वादावरून १७ मे रोजी दुपारी गट क्रमांक २५१ मध्ये दोन्ही गटांत वाद झाला. त्यानंतर सायंकाळी गावात आल्यावर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. कृष्णा आप्पा सोनुने, आप्पा मजीबा सोनुने, होसाबाई आप्पा सोनुने, सारलाबाई कृष्णा सोनुने, पद्मबाई मजीबा सोनुने यांनी केशवराव सोनुने व त्यांची पत्नी कडूबाई केशवराव सोनुने यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर केशवराव सोनुने हे जागीच बेशुद्धपडले. त्यानंतर गावातील नागरिकांनी धावपळ करून जखमीला छत्रपतीनगर येथे घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या प्रकरणात कडूबाई सोनुने यांच्या तक्रारीवरून वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, पोलिसांनी दोघांना अटक केली होती. त्यांची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे. मात्र, केशवराव सोनुने यांचा मंगळवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर वरील संशयित आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अंत्यसंस्काराला पोलीस बंदोबस्त
मयताचे पार्थिव गावात आणल्यानंतर नातेवाइकांनी सर्वच आरोपींना अटक करण्याची मागणी करीत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांना अटक केल्यानंतर अंत्यसंस्कार केले जातील, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भोकरदन पोलिसांनी खंडाळा येथे उपस्थित राहून नातेवाइकांची समजूत काढली. त्यानंतर सायंकाळी पोलिस बंदोबस्त मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
.हेही वाचा