Lakh school: वर्षभर चालणारी शाळा; लाख येथील विद्यार्थी सुटीतही घेतायेत शिक्षण
हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेबाबत सातत्याने शंका उपस्थित केली जात असताना औंढा नागनाथ तालुक्यातील लाख (Lakh school) येथील उपक्रमशील शिक्षकांमुळे तेथील शाळा वर्षभर सुरूच राहते. रविवार असो की, सार्वजनिक सुट्टी या सर्वच काळात विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत असतात.
जवळपास साडेतीन हजार लोकसंख्या असलेल्या लाख (Lakh school) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 138 विद्यार्थी आहेत. पहिली ते चौथीपर्यंत येथे वर्ग भरतात. सध्या सहा शिक्षक उपलब्ध आहेत. मागील काही वर्षापासून येथे शिक्षकांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळेची गुणवत्ता वाढविली आहे. वर्षभर शाळा सुरूच असते. यासाठी मुख्याध्यापक व शिक्षक आपल्या नियोजनानुसार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वेळ देतात. 1 मेपासून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना सुट्टया लागल्या आहेत. परंतू, येथील प्राथमिक शाळा मात्र विद्यार्थ्यांनी कायम गजबजलेली असते.
मुख्याध्यापक उत्तम वानखेडे व त्यांच्या सहकार्यांनी वासंतिक वर्ग सुरू ठेवले आहेत. सकाळी 8 ते 10 या वेळेत तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना पूरक अभ्यासक्रम शिकविण्यात येतो. वर्षभर तर विद्यार्थ्यांची स्पर्धा परिक्षेसाठी तयारी केली जाते. शाळेतील तिसरी व चौथीतील मुले इंग्रजीचे वाचन करण्याबरोबरच इंग्रजी बोलतातही. बालपणापासूनच विद्यार्थी संगणक साक्षर व्हावेत. यासाठी शाळेत असलेल्या लॅबचा पुरेपूर वापर केला जात आहे. विद्यार्थ्यांना विविध सॉफ्टवेअरची ओळख करून दिली जात आहे.
वक्तृत्व, निबंध यासारख्या स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थी अव्वल ठरले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेची प्रचंड गोडी लागली असून 90 टक्केपेक्षा अधिक मुले एकही दिवस शाळा बुडवत नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. शाळेच्या परिपूर्ण विकासासाठी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती नेहमीच पुढाकार घेत असल्यामुळे शिक्षकांचे मनोबल उंचावले आहे. मुख्याध्यापक उत्तम वानखेडे, गजानन बांगर, देशपांडे, भालेराव, सामाले, चव्हाण या शिक्षकांनी शाळेची गुणवत्ता जिल्हाभरात उंचावली असल्याने ही शाळा चर्चेत आली आहे.
हेही वाचा

