घनसावंगी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राला शोभेल असा एक शुभविवाह घनसावंगी तालुक्यातील खालापुरी या छोट्याशा गावात झाला आहे. किडनीच्या आजाराने निधन झालेल्या मोठ्या भावाच्या पत्नीसोबत लहान भावाने लग्नगाठ बांधून नवा आदर्श उभा केला आहे. या सोहळ्यास उपस्थित असलेल्या वर्हाडींनी देखील मोठ्या उत्साहात आणि आनंदात नवदाम्पत्याचे स्वागत करुन शुभाशीर्वाद दिले.
खालापूरी या छोट्याशा गावात भिकाजी नाना मरकड नावाचे गृहस्थ राहतात. त्यांना नितीन व सचिन अशी दोन मुले होती. त्यांना एक गुंठाही शेती नाही. रोज कमवुन खाणे असा नित्यक्रम, अशा परिस्थितीत नितीनचे सहा वर्षांपूर्वी पूजा सोबत लग्न झाले. त्यांना जयराज नावाचा एक मुलगा आहे. काही महिंन्यापूर्वी किडनीच्या आजाराने नितीनचे निधन झाले. त्यामुळे नीतीनच्या आई-वडीलांना पूजा व तिच्या मुलाची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न पडला. यानंतर गावातील काही मंडळींनी दीर सचिनशी वहिनी पूजाचे लग्न लावून देण्याबाबत सांगितले. गावातील किशोर मरकड व सहकाऱ्यांनी हा विषय लावून धरत सर्व भावकी समोर हा विषय मांडला. भावकीतील व गावातील जेष्ठ मंडळींनी पुढाकार घेत विवाहाला मान्यता दिली. मंगळवारी (दि.१०) माळावरचा गणपती येथे हा आदर्श विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याने पूजाला आपला जन्माचा जोडीदार मिळाला. जयराजलाही पितृछत्र मिळाले. या विवाह सोहळ्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी किशोर मरकड, उध्दव मरकड, डॉ. गांडगे, रणवीर मरकड यांनी प्रयत्न केले.
हेही वाचा :