परभणी : बोरगाव शिवारात बिबट्याचे दर्शन; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण | पुढारी

परभणी : बोरगाव शिवारात बिबट्याचे दर्शन; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

रेणाखळी; पुढारी वृत्तसेवा पाथरी तालुक्यातील रेणाखळी शिवारात ऊसाच्या शेतात जाळीत बिबट्या मृतावस्थेत आढळल्याचे प्रकरण ताजे आहे. असे असताना रेणाखळी जवळील बोरगाव शिवारात बाबुराव विश्वनाथ गुंडे यांचा शेतगडी शेरखान यांस दि.५ मे रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिबट्यासदृश्य प्राणी व त्‍याच्या पायाचे ठसे दिसले आहेत.

बोरगाव शिवारात बिबट्या दिसल्याची बातमी गावात पसरल्‍याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या दिसल्‍याची बातमी समजताच वनरक्षक एम बी कुंभकर्ण, पांडुरंग वाघ, शेळके हरहरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून बिबट्या सदृश्य प्राण्याच्या पायाची ठसे आढळून आल्याचे नोंद केली आहे. सर्व शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, रात्रीच्या वेळी शेतात गुरेढोरे बांधू नयेत, फटाके व त्यांचे आवाज करावे असे बोरगाव व आजूबाजूच्या गावातील नागरिकांना सुचित करून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी पाथरी पोलीस स्टेशनचे पीएसआय बुद्धराज सुकाळे, कर्मचारी जाधव आदींनी सहकार्य केले.

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याखाली असलेले रेणाखळी, देवेगाव, सिमुरगव्हाण, बोरगाव आदी गावात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने लोकांना रात्री बेरात्री उसाला पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. वनविभागाने ह्या बाबतीत लक्ष देऊन परिसरात वावरत असलेल्या बिबट्याचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांचे जनावरांचे व त्यांच्या जिविताचे रक्षण करावे अशी परिसरातील शेतकऱ्यांतून मागणी होत आहे.

हेही वाचा :  

Back to top button