परभणी : रामपुरी येथे गोदावरी पात्रात युवक बुडाला | पुढारी

परभणी : रामपुरी येथे गोदावरी पात्रात युवक बुडाला

मानवत (जि. परभणी), पुढारी वृत्तसेवा : मानवत तालुक्यातील रामपुरी (बु) येथील गोदावरी नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेलेला युवक पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. शनिवारी (दि. ६) दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली असून त्याचा शोध सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की, मानवत तालुक्यातील रामपुरी (बु) येथे बारा हनुमंताचे प्रसिद्ध पुरातन मंदिर गोदावरी नदी काठी आहे. या ठिकाणी अनेक भावीक अभिषेक करण्यासाठी दररोज येतात. शनिवारी (दि. ६) तालुक्यातील सावळी येथील काळे कुटुंबातील काही जण रामपुरी येथे अभिषेक करण्यासाठी आले होते. अभिषेक करण्याच्या आधी ऋषिकेश आण्णासाहेब काळे (वय 21) हा युवक गोदावरीच्या नदीपात्रात आंघोळीसाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला.

घटनास्थळी रामपुरी व सावळी येथील ग्रामस्थ तसेच पोलीस कर्मचारी मधुकर चट्टे व प्रल्हाद वाघ पोहचून शोध कार्य सुरू केले. एनडीआरएफची टीम व स्थानिक मच्छीमारही शोध कार्यात सहकार्य करत आहेत. पण रविवारी (दि.७) सकाळी ११ वाजेपर्यंत तरी बुडालेला युवक सापडलेला नाही. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने शोध कार्यात अडथळा येत अससल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Back to top button